खंडणीखोर कानवडेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
नायक वृत्तसेवा, अकोले
येथील बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीकांत नाईकवाडी यांच्याकडून 55 लाख रुपयांची खंडणी उकळणार्या अकोले येथील गणेश कानवडेसह त्याचा भाऊ व पुतण्या या तिघांचे अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यालयाने फेटाळले. त्यानंतर खंडणीखोर गणेश कानवडे न्यायालयातून बाहेर पडताच अकोले पोलिसांनी मुसक्या आवळून त्यास गजाआड केले.
बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीकांत नाईकवाडी यांनी 2 फेब्रुवारी, 2021 रोजी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शहरातील गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे व पुतण्या मयूर सुभाष कानवडे (सर्व रा.अकोले) या तिघांविरुद्ध अकोले पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर गणेश कानवडे त्याचा भाऊ सुभाष कानवडे आणि त्याचा पुतण्या मयूर कानवडे हे फरार झाले होते. त्यांनी वकील कवडे यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु न्यायालयाने वरील तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. त्याचवेळी न्यायालयातून बाहेर पडताच अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी गणेश भागुजी कानवडे यास ताब्यात घेत अटक केली आहे.