नेवासा बाजार समितीच्या आवारात चोरट्यांचा धुडगूस चार दुकाने फोडून तीन लाखांचा ऐवज केला लंपास

नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चोरट्यांनी धुडगूस घातला असून चार दुकाने फोडली आहे. एक लाखांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. सोमवारी (ता.8) रात्री हा प्रकार झाला. चोरीच्या सत्रामुळे व्यापारी भयभीत झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थापनाने याकडे लक्ष देऊन व्यापार्यांच्या मालाला संरक्षण देण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

नेवासाफाटा रस्त्यावर मध्यमेश्वरनगर जवळ नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार आहे. येथील आवारातच विविध आडत व्यापार्यांची दुकाने व गोदामे आहेत. याठिकाणी सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी एकाच रांगेमधील व्यापारी देविदास साळुंके व इतरांच्या अशा चार दुकानांचे शटर तोडून धुडगूस घातला. यामध्ये त्यांनी कपाटांची उचकापाचक केली. बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या लगतच असलेल्या श्रीराम पवार यांच्या दुकान व गोदामातील कपाटातील कागदपत्रांची उचकापाचक केली.

गोदामात केवळ धान्यच असल्याने चोरट्यांचा काहीच हाती लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी देविदास सदाशिव साळुंके यांच्या गोदाम कार्यालयाचा दरवाजा तोडून लोखंडी कपाट तोडले. आतमधील सोन्याचे दागिने व एक लाखांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. त्यानंतर शेजारीच असलेल्या मुकेश कोठारी यांच्या कार्यालयातील कपाटातील काही रोकड रक्कम चोरीस गेल्याचे समजले. त्यानंतर भू-वजन काटा कार्यालयामध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. सलग चार दुकाने फोडून बराच वेळ चोरट्यांनी धुडगूस घातला. यातील काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अधिक तपासासाठी पोलीस त्यांची मदत घेत आहे. सलग चार ठिकाणी झालेल्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय करे हे करत आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने ही कृषी उत्पन्न बाजार समिती अडचणीत सापडली आहे. तसे पाहिले तर बाजार समितीचे आवारच रामभरोसे झाले आहे. टारगटांचा येथे नेहमी वावर असतो याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे असून मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणेही गरजेचे आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेची आहे.
