कोपरगावला सरकारकडून दिवाळीची अनोखी भेट पाणी पुरवठा योजनेस 120 कोटी मंजूर ः काळे

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
ऐन दिवाळीच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकारने कोपरगाव शहराला अनोखी भेट दिली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी 120 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस मंगळवारी (ता.26) तांत्रिक मंजुरी दिली आहे. त्यात पाच क्रमांकाच्या साठवण तलावासह जलवाहिन्यांच्या कामाचा समावेश आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वचनपूर्तीच्या दृष्टीने पडलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना आमदार काळे म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत आपण शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना साकडे घातले होते. त्यांनी स्वतः या प्रश्नात लक्ष घातले. आपण सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून या 120 कोटी रुपये खर्चाच्या योजनेस आज तांत्रिक मंजुरी मिळाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण याप्रश्नी उपोषण देखील केले होते. निवडणुकीत जनतेने आपल्या बाजूने कौल दिला. पहिल्या दोनच महिन्यांत पाच क्रमांकाच्या साठवण तलावाची बरीचशी खोदाई ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेवरून, संबंधित ठेकेदार कंपनीने विनामूल्य केली. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेस तांत्रिक मंजुरी देखील दिली आहे. आमदार झाल्यापासून आपण सातत्याने या योजनेचा पाठपुरावा करीत होतो. येणार्‍या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करीत होतो. या पाठपुराव्याला यश आले आहे.

कोपरगाव शहराला उन्हाळ्यात दहा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळायचे. अपुर्‍या साठवण क्षमतेबरोबरच जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्यास गळती लागली. त्यामुळे काहीवेळा साठवण तलावात पाणी असतानाही शहराला पुरेसा पाणी पुरवठा करता येत नव्हता. आता पाच क्रमांकाच्या तलावाचे काम पूर्ण होईल आणि नव्या जलवाहिन्या टाकल्या जातील. त्यामुळे सर्वत्र सारख्या दाबाने पाणी मिळू शकेल.
– आशुतोष काळे, आमदार

Visits: 13 Today: 1 Total: 115067

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *