माळवाडीमध्ये महामार्गावरील दुभाजकावर कार आदळली
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील माळवाडी येथे दुभाजकावर जोराने कार आदळून सोमवारी (ता.8) अपघात घडला. यामध्ये केवळ दैव बलवत्तर असल्याने कारचालक बालंबाल बचावला आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अमोल लहानू मुळे (रा.डोळासणे) हे डोळासणे येथून कार (क्रमांक एमएच.05, डीके.8592) हिच्यामधून सोमवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने आळेफाट्याच्या दिशेने जात होते. बोटा शिवारातील माळवाडी शिवारात आले असता त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट दुभाजकाला आदळली आणि ढंपरला धडक दिली. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ दैव बलवत्तर असल्याने कारचालक मुळे हे बालंबाल बचावले आहेत. दरम्यान, माळवाडी गावचे पोलीस पाटील संजय जठार यांनी घटनेची माहिती तत्काळ मोबाइलवरवरून डोळासणे महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद गिरी, सुनील साळवे, संजय मंडलिक, उमेश गव्हाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनला पाचारण करुन अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला केली.