राज्यात सर्वात जास्त गुन्हेगारी अहमदनगर जिल्ह्यात ः पाटील गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा ठरणार फायदेशीर
![]()
नायक वृत्तसेवा, राहुरी
‘राज्यात सर्वात जास्त गुन्हेगारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडतात. मागील वर्षी जिल्ह्यात 42 हजार, तर पुणे जिल्ह्यात 23 हजार गुन्हे दाखल झाले. पोलीस अधीक्षकपदी रुजू झाल्यावर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यान्वित होणारी ग्राम सुरक्षा यंत्रणा महत्त्वाची ठरेल,’ असा आशावाद पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, ‘गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात नवीन यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे. एका कॉलवर गावभर संदेश जाणार आहे. ही यंत्रणा गावोगावी वापरण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हाभर ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.’ तर ग्राम सुरक्षा यंत्रणेचे जनक डी. के. गोर्डे म्हणाले, गावात चोरी- दरोड्याची घटना, वन्य प्राण्यांचा हल्ला, जळिताची घटना, महापूर, अशा आकस्मिक घटनांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत तातडीने मदत मिळविणे, दुर्घटनेस आळा घालणे शक्य होणार आहे. याचा पोलीस प्रशासनाला निश्चितच फायदा होईल. याशिवाय ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे गावातील निधन वार्ता, ग्रामसभा, शासकीय योजना, मेळावे, शिबिरे यांची देखील माहिती तत्काळ ग्रामस्थांपर्यंत पोचविणे सोपे होईल. गावातील सर्व मोबाईलधारक ग्रामस्थ सुरक्षा यंत्रणेत सहभागी होऊ शकतात, असे सांगितले.

राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रीरामपूर भागाचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक नीलेश वाघ, तुषार धाकवार, तालुक्यातील पोलीस पाटील, तलाठी, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

ग्राम समितीचा राहणार ‘वॉच’…
आगामी काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा समित्या स्थापन करण्यात येतील. समितीत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असेल. गावात घडणार्या घटनांची माहिती समित्यांद्वारे प्रशासनापर्यंत पोहोचविली जाणार आहे.
