कोविडने घेतले तालुक्यातील आणखी दोघांचे बळी! संक्रमणातही झाली मोठी वाढ; आजही समोर आले एकोणपन्नास नवीन रुग्ण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दररोज नवीन विक्रम करीत आहे. मर्यादा झुगारुन झालेल्या सोहळ्यांनी माघारी निघालेल्या कोविडला पुन्हा खेचून आणले आहे. त्याचा परिणाम आता शहरासह तालुक्यातील सर्व भागात दिसू लागला असून फेब्रुवारीच्या शेवटास असलेला सरासरी रुग्णवाढीचा वेग मार्चमधील पहिल्या चार दिवसांतच आणखी तीव्र होताना आता थेट 44 रुग्ण प्रती दिवसांवर जावून पोहोचला आहे. त्यासोबतच बुधवारी तालुक्यातील आणखी दोघांचा कोविडने बळीही घेतला आहे. तर आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील सतराजणांह एकूण एकोणपन्नास जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या सात हजारांचा आकडा पार करुन 7 हजार 31 झाली आहे.

नववर्षात सर्वकाही सुरळीत राहिल्याने आणि नागरिकांनीही संयमाचे दर्शन घडवल्याने देशभरातून कोविडचा माघारीचा प्रवास सुरु झाला. त्यातच लसीकरणही सुरू झाल्याने देशात महामारीच्या आवर्तनानंतर जणू चैतन्याचा पाझरच फुटल्यासारखी स्थिती होती. मात्र काही ठिकाणी कोविडचा पुन्हा उद्रेक झाला आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यासह संगमनेरातही पोहोचला. प्रशासनाने साथरोग प्रतिबंधक कायद्याचा आधार घेवून सार्वजनिक व्यवस्थेबाबत प्रतिबंध लागू केले. त्यात सार्वजनिक आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर थेट बंदी तर अंत्यविधी व लग्न सोहळ्यांसाठी मर्यादित उपस्थिचे बंधन घालण्यात आले. नियमांची सक्तिने अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांनी मंगल कार्यालये, लॉन्स व सभागृह चालकांना नोटीसा बजावून नियमांचे स्मरण करुन दिले.

त्यामुळे अनेकांनीं विवाहस्थळांची नोंदणी रद्द करुन तालुक्याच्या ठिकाणापासून दूरवरील रिसॉर्टस्, फार्म हाऊस अथवा गावाकडील धार्मिक स्थळे किंवा आपल्या शेतातच मनाप्रमाणे, कोविडच्या नियमांची एैशीतैशी करीत जंगी सोहळे साजरे केले. त्याचा परिणाम संगमनेर तालुक्यातून फेब्रुवारीच्या सुरुवातीला जवळपास संपुष्टात आलेला कोविड पुन्हा उफाळून आला आणि त्याने शहरासह तालुक्यात पुन्हा संक्रमण वाढवण्यास सुरुवात केली आहे. आजही (ता.4) त्यात 49 रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील सतरा तर ग्रामीणभागातील 32 जणांचा समावेश आहे. बुधवारी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघा कोविड बाधितांचा मृत्यू झाला. त्यात बाजारपेठेतील 68 वर्षीय व्यापार्यासह जवळे कडलग येथील 51 वर्षीय इसमाचा समावेश होता.

शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मेनरोडवरील 87 व 59 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 83 वर्षीय इसमासह 74 वर्षीय महिला, अभिनव नगरमधील 49 वर्षीय इसम, गणेशनगर मधील 58 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 30 वर्षीय तरुण, सावतामाळीनगर मधील 30 वर्षीय महिला, समर्थनगर मधील 46 वर्षीय इसम, देवाचा मळा येथील 49 वर्षीय इसम, कुंभार गल्लीतील 41 वर्षीय महिला व 40 वर्षीय तरुण, वकील कॉलनीतील 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 41 वर्षीय महिला आणि 20 वर्षीय तरुणाह 15 वर्षीय मुलगा.

ग्रामीण क्षेत्रात निमगाव भोजापूर येथील 53 वर्षीय महिला, घारगाव येथील 42 वर्षीय तरुण, साकूर येथील 25 वर्षीय तरुण, राजापूर येथील 56 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 31 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 84 व 43 वर्षीय महिला व 9 वर्षीय मुलगा, पळसखेडे येथील 45 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 35 वर्षीय तरुण, विठ्ठलनगर (गुंजाळवाडी) येथील 46 वर्षीय महिला, गुंजाळवाडीतील 44 वर्षीय तरुण, रहाणे मळ्यातील 49 वर्षीय इसम, निमज येथील 32 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 38 व 25 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, 10 वर्षीय बालिका, झोळे येथील 25 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 25 वर्षीय महिला, शेडगाव येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रहिमपूर येथील 63 वर्षीय ज्येष्ठासह 35 वर्षीय तरुण, वरुडी पठार येथील 52 वर्षीय इसम, चिखलीतील 55 व 30 वर्षीय महिलेसह 9 वर्षीय मुलगा आणि चंदनापूरी येथील 55 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज 49 रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील बाधितांनी सात हजारांचा आकडा ओलांडून आता 7 हजार 31 रुग्णसंख्या गाठली आहे.

अचानक वाढलेल्या कोविड संक्रमणाला प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन साजरे झालेले विवाह सोहळे कारणीभूत आहेत. या विषयावर दैनिक नायकने अगदी प्रादुर्भाव वाढू लागल्यापासून लक्ष वेधले आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयातून दैनिक नायकच्या या वृत्तावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाल्याची वार्ताच मिळाली आहे. त्या खासगी रुग्णालयात आपल्याच विवाह सोहळ्यात कोविडने जायबंदी झालेले जोडपे, त्यांचे सासू-सासरे व अन्य नातेवाईक दाखल आहेत. तरीही तालुक्यातील ‘गुपचूप’ लग्न सोहळे सुरुच आहेत.

