अल्पवयीन तरुणीला फसवून बदनामीची धमकी देत केला अत्याचार! राहाता पोलिसांत गुन्हा दाखल; नेवासा तालुक्यातील आरोपी गजाआड

नायक वृत्तसेवा, राहाता
समाज माध्यमातून अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीला फसवून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राहाता पोलिसांनी आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, खळबळ उडाली आहे.

राहाता पोलिसांत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 23 जून, 2020 रोजी सौरभ विठ्ठल कातकाडे याने मोबाईल क्रमांक प्राप्त करून व्हाट्सअ‍ॅप माध्यमातून ‘हाय’ संदेश टाकला. त्यानंतर त्यास प्रतिसाद दिला नाही. परंतु तो रोज संदेश टाकू लागल्याने, त्याला फोन करून कोणाचा क्रमांक आहे असे विचारल्याने त्याने सौरभ विठ्ठल कातकाडे असे नाव सांगितले. त्यानंतर रोज चॅटिंग करू लागला. यानंतर त्याला टाळाटाळ करुनही तो रोज संदेश व फोन करु लागला.

यावरच न थांबता, त्याने धमकावले, ‘तु जर मला भेटायला नाही आली तर मी तुझ्या घरी येईल’ असे म्हटल्याने पीडित तरुणी घाबरली. त्यामुळे त्याला 10 ऑक्टोबर, 2020 रोजी राहाता येथे भेटली. भेटल्यानंतर त्यानेफोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार जवळीक साधून तुझ्या टेन्शनमुळे मी गोळ्या खाल्ल्या, औषधोपचारांसाठी 1 लाख 37 हजार रुपये जबरदस्तीने घेतले. तसेच मित्रांकडून पाठलाग करून धमकावले. लोणी येथे महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याने त्याने लोणी येथे भेटण्यास बोलावले.

त्यास नकार दिल्याने त्याने संदेश व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याचा फायदा उठवून लोणी येथे जबरदस्तीने भेटायला येत होता. घरच्यांना सांगण्याची धमकी देत असल्याने पीडित तरुणी प्रचंड घाबरून गेली होती. आरोपी सौरभ याने 2 ऑगस्ट, 2021 रोजी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून लोणी येथील एका रुममध्ये नेऊन जबरदस्तीने शरीरसंबंध केले. या गंभीर प्रकाराने घाबरलेली असल्याने घरातील व्यक्तींना काहीही सांगितले नाही. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करू लागला. पैसे दिले नाही तर तुझ्या सोबतचे फोटो व्हायरल करेल व तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड फेकून मारील अशी धमकी देत होता.

हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी लोणी पोलीस ठाण्यात सौरभ कातकाडे याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद केला. मात्र, बदनामी होईल म्हणून त्यावेळी घरातील व्यक्तींना शारीरिक संबंध केल्याचे सांगितले नव्हते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा वडिलांना संदेश करून धमक्या देऊ लागला. त्यामुळेे वडिलांनी आणि पीडित तरुणीने 14 ऑगस्ट, 2021 रोजी राहाता पोलिसांत तक्रार दिली. तरी देखील वडिलांना व पीडितेला संदेश करून धमकी देत असल्याने ‘तो’ धक्कादायक प्रकार कथन केला.

अखेर पीडित अल्पवयीन तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी आरोपी सौरभ विठ्ठल कातकाडे (वय 21, रा.रानमळा, ता.नेवासा) याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, 354, 385, 504, 507, 34 आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस आरोपीच्या मित्रांचा शोध घेत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करत आहे.

Visits: 170 Today: 1 Total: 1788254

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *