आरोपीला पळून जाण्यास मदत करणारा व्यापारीही ‘मिटकें’च्या ‘मिठीत’..! बहुचर्चित पत्रकार दातीर हत्याकांडप्रकरणी राजकीय दबाव धुडकावून व्यापाऱ्याला केले सहआरोपी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन महिन्यांपूर्वी राहुरीत घडलेल्या पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांडातील आरोपीला फरार होण्यास मदत करणाऱ्या अनिल गावडे या व्यापार्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्यापाऱ्याच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त असल्याने त्याचे काहीच वाकडे होणार नाही अशा चर्चा राहुरीत सुरु होत्या. मात्र त्या वायफळ ठरवीत श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी त्या व्यापाऱ्यालाही कायद्याच्या मिठीत घेत ‘त्या’ राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मिटकेंनी दाखवलेले धाडस जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवले तर कदाचित जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढलेला टक्का कमी होण्यास मदत होईल. उपाधिक्षक मिटकेंनी दाखवलेल्या या धाडसाचे राहुरीतून कौतुक होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रस्त्यावरून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण करून त्यांना अज्ञातस्थळी नेले. याप्रकरणी सुरुवातीला राहुरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र त्यानंतर दातीर यांचा मृतदेह आढळून आल्याने 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास राहुरीचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडे होता. मात्र काही कारणास्तव त्यांना रजेवर जावे लागल्याने पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला. मात्र तोपर्यंत या प्रकरणाच्या तपासाची दिशा भरकटली होती. एका पत्रकाराचा खून झाल्याने दररोज त्यावर निवेदने आणि बातम्यांचा भडीमार यामुळे पोलीस यंत्रणेवरील दबाव वाढत होता. त्यातून तालुक्यातील अनेक प्रतिष्ठितांची नावेही या हत्याकांडाशी जोडली गेली. मात्र निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशीच राहीले.

या हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या घटनेतील बारकाव्यांचा अभ्यास करून तपासाला गती दिली. त्यातून या हत्याकांडातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याला नेवासा फाटा येथून सापळा रचून शिताफीने अटक केली. तर दुसरा आरोपी अक्षय कुलथे थेट उत्तर प्रदेशात जावून लपला होता. तेथून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या आरोपींच्या कोठडीतील चौकशीतून कान्हू मोरे याला पसार होण्यात राहुरीतील व्यापारी अनिल गावडे याने आर्थिक साहाय्य केल्याची माहिती समोर आली. ही वार्ता राहुरीतील जनमानसातही पोहोचल्याने गेल्या काही दिवसांपासून राहुरीत उलटसुलट चर्चांचे अक्षरशः पीकं आले होते. पत्रकाराच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीला आर्थिक मदत करणारा तो व्यापारी राजकीय छत्रछायेतील असल्याने त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी चर्चा राहुरीत सुरू होती.

उपाधीक्षक मिटकेंनी मात्र ती चर्चा फोल ठरवतांना पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांडप्रकरणी राहुरीतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अनिल गावडे या व्यापाऱ्याला सह आरोपी केले आहे. याबाबत श्रीरामपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात कलम 212 प्रमाणे अहवाल सादर करण्यात आला आहे. राजकीय दबाव झुगारून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी राजकीय वरदहस्त लाभलेल्या व्यापाऱ्याला कायद्याच्या मिठीत घेतल्याने राहुरीतून त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही अशाच पद्धतीने कायदा सर्वश्रेष्ठ मानून काम केल्यास जिल्ह्यातील वाढलेला गुन्हेगारीचा आलेख खाली येण्यास मदत होईल.

Visits: 736 Today: 5 Total: 1112892
