नवीन तांबे हॉस्पिटल ते गुंजाळवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी! दिवसेंदिवस रस्त्यावर वर्दळ वाढत असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराची राज्यात समृद्ध शहर म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. बाजारपेठ, आरोग्य सुविधा यांसह मोठमोठ्या इमारती येथे साकारल्या आहेत. यामध्ये सातत्याने भर पडत असून शहराचा विस्तारही झपाट्याने वाढत आहे. शहराजवळील घुलेवाडी, कासारवाडी, जुना पुणे महामार्ग परिसरासह नवीन तांबे हॉस्पिटलपासून गुंजाळवाडीला जाणार्या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. राजापूरमार्गे संगमनेरला येण्यासाठी अनेकजण या रस्त्याचा वापर करत आहे. तर सकाळ-संध्याकाळ नागरिक व भरतीपूर्व तयारी करणारी तरुणाई व्यायामासाठी येतात. यामुळे कायमच रस्त्यावर रहदारी दिसते. या पार्श्वभूमीवर येथे वास्तव्यास असणार्या नागरिकांसह ये-जा करणार्यांकडून या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी जोर धरु लागली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन तांबे हॉस्पिटल ते गुंजाळवाडी हा प्रस्तावित रस्ता पाच वर्षांपूर्वी खोलवाट तयार करण्यात आला. त्यावेळी गुंजाळवाडी ग्रामस्थ व तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकार्यांचा यामध्ये सहकार्याचा मोठा वाटा होता. परंतु, स्थानिक शेतकर्यांनी यास विरोध दर्शवून या कामात अडथळा निर्माण केला होता. विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिक-पुणे बाह्यवळण रस्त्याची गरज लक्षात घेऊन त्यास मंजुरी दिली होती. कालांतराने स्थानिक शेतकर्यांनी संमती देऊन नवीन तांबे हॉस्पिटल ते गुंजाळवाडी रस्त्याच्या कामास सुरवात झाली.
सदरचा रस्ता झाल्याने संगमनेर शहर ते पुणे-नाशिक बाह्यवळण महामार्गाचे अंतर अगदी एक किलोमीटर अंतरावर आले. यामुळे येथील परिसराचे स्वरूपही बदलून गेले. नागरी वस्तीकरिता प्रथम पर्याय म्हणून अनेकजण निवड करु लागले. यातून ढोले, गुंजाळ यांची नवी रहिवासी संकुले उभी राहिली. तसेच मालपाणी उद्योगासह इतर छोट्या-मोठ्या शेतकर्यांनी शेतीचे बिनशेती करून इच्छुकांची गरज भागवत नवीन वसाहती निर्माण करण्यास चालना दिली.
परंतु, शहराला अगदी कमी वेळात सुसह्यपणे जोडणारा रस्ता म्हणून प्रवासी या रस्त्याला पसंदी देवू लागले. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढून वर्दळ वाढली. त्यातच सकाळ व सायंकाळ फिरणार्या नागरिकांसह भरतीपूर्व प्रशिक्षण घेणार्या तरुणाईची देखील संख्या वाढल्याने अरुंद रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. सध्याची गरज लक्षात घेता रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजचे आहे. यामुळे अपघात टळून वाहतुकीस ठरणारा अडथळा देखील दूर होईल. यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह ये-जा करणार्यांनी केली आहे.