तब्बल 10 वर्षांनी ट्रकचालकाच्या खुन्याला पोलिसांनी पकडले स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; परळीतून आवळल्या मुसक्या

नायक वृत्तसेवा, नगर
क्षुल्लक कारणातून सहकारी ट्रकचालकाचा खून करून आरोपी फरार झाला होता. पोलिसांना सापडू नये म्हणून या आरोपीने नाव बदललं, नव्या नावाने अधारकार्डही तयार करून घेतलं. मात्र तपास करत असताना पोलिसांनीही चिकाटी सोडली नाही आणि 10 वर्षांनी त्याला गाठलेच. तेव्हाही आधारकार्ड समोर करून तो मी नव्हेच अशी भूमिका आरोपीने घेतली. मात्र, त्याचा हा खोटेपणा फार काळ टिकला नाही. त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांना त्याचे जुने निवडणूक ओळखपत्र सापडले. त्यावर त्याचे खरे नाव नमूद होते. त्याआधारे त्याची ओळख पटवून पोलिसांनी अटक केली आणि आरोपीने आपल्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेतील अधिकारी-अंमलदार गणेश इंगळे, राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाने, भीमराज खसे, सुरेश माळी, रवीकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार व बबन बेरड यांच्या पथकाने हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला आहे.

आरोपी भरत मारुती सानप (रा. खडकवाड, जि. बीड) हा आपली ओळख लपवून अभिमान मारुती सानप या नावाने कन्हेरवाडी (ता.परळी) येथे राहत होता. त्याला अटक केल्यानंतर या गंभीर गुन्ह्याची आणि त्याने केलेल्या लपवाछपवीची माहिती पुढे आल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले. सुमारे 11 वर्षांपूर्वी नगरच्या एका ट्रकचालकाचा बुलडाणा जिल्ह्यात खून झाला होता. आरोपीने त्याचा खून करून सिंधखेडराजाजवळ त्याचा मृतदेह जाळून टाकला होता. तसेच त्याच्या ताब्यातील ट्रक चोरून नगरला आणला. त्यातील सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मालही आरोपींनी परस्पर विकला आणि नंतर फरार झाला होता. तेव्हापासून सिंधखेडराजा आणि नगरचे पोलीसही आरोपीचा शोध घेत होते. मात्र, 10 वर्षे तो पोलिसांना सापडला नाहीच.

अलिकडेच या आरोपीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी सानप नाव बदलून कन्हेरवाडीला राहत आहे. त्यानुसार पोलीस पथक तेथे गेले. त्याला नाव विचारले असता त्याने अभिमान मारुती सानप असे सांगितलं. त्या नावाचं आधारकार्डही दाखवलं. मात्र, आरोपी खोटे बोलत आहे, याची पथकातील अधिकार्‍यांना खात्री होती. त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली. इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तर त्याच्याकडे 2006 मधील मतदान ओळखपत्र सापडले. त्यावर त्याचे नाव भरत मारुती सानप असं असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच भरत मारुती सानप असल्याचे सांगितले आणि त्यानंतर संपूर्ण घटनाक्रमही पोलिसांना सांगितला.

ज्या ट्रकचालकाचा खून केला तो अनिल सोनवणे हा सानप याला वैयक्तिक पातळीवर टोमणे मारून टीका करत असे. त्याचा आरोपीला राग येत असे. प्रवासात असताना गोदिंया जिल्ह्यात एका ठिकाणी ते ट्रकच्या चाकातील हवा चेक करण्यासाठी थांबले. त्यावेळीही सोनवणे याने चिडवल्याने दोघांत वाद झाला. त्यावेळी सानप याच्या हातात लोखंडी पाना होता. त्याने तोच सोनवणे याच्या डोक्यात मारला आणि त्यात सोनवणे बेशुद्ध पडला. आरोपी सानप याने सोनवणेला ट्रकमध्येच टाकलं. मात्र सिंधखेडराजा येथे आल्यावर सोनवणे याच्या हालचाली बंद झाल्याने तो मरण पावल्याचे सानपच्या लक्षात आले. त्याने एका पुलाजवळ गाडी थांबविली. तेथील गवत आणि ट्रकमधील कपडे टाकून त्याने सोनवणे याचा मृतदेह नाल्याच्या शेजारी पेटवून दिला. त्यानंतर ट्रक घेऊन नगर जिल्ह्यात आला. सुनील आश्रुबा सानप व परमेश्वर उत्तम दराडे यांच्या मदतीने ट्रकमधील साडेपाच लाख रुपयांच्या वायरची विल्हेवाट लावली. ट्रक भगवानगडाजवळ सोडून देऊन आरोपी पळून गेला. त्यानंतर आरोपी नाव आणि ठिकाण बदलून राहू लागला. अखेर 10 वर्षांनी का होईना पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले आणि त्याला बेड्या ठोकल्या.

Visits: 99 Today: 3 Total: 1104734

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *