अवैध उत्खनन प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा
अवैध उत्खनन प्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील मांजरी येथे शेतातील मातीचे बेकायदा उत्खनन करताना पोलिसांनी एक जेसीबी, चार ट्रॅक्टर असा एकूण 45 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पर्यावरण संरक्षण व शेतातील माती काढून टाकण्याच्या कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

संदीप एकनाथ विटनोर (रा.मांजरी), आशीर लालाभाई शेख (रा.पिंप्रीवळण), सुनील दादा जंगले, ज्ञानेश्वर रखमाजी कंक, नवनाथ ज्ञानेश्वर जंगले, जिजाबाई वसंत जंगले (चौघेही रा.पानेगाव, ता.नेवासा), मोहंमद शेख (रा.खेडले परमानंद, ता.नेवासा), जनार्दन गागरे (पूर्ण नाव पत्ता समजला नाही) अशी गुन्हा नोंदविलेल्यांची नावे आहेत. मांजरी येथे गट क्रमांक 618 मधील शेतजमिनीतील शासनाच्या मालकीची माती विनापरवाना, बेकायदा उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. काल दुपारी पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख, उपनिरीक्षक नीरज बोकील यांनी पथकासह घटनास्थळी छापा घातला. पोलिसांना पाहताच संशयित पसार झाले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण केकाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

