वखार महामंडळाच्या गोदामातील कापसाच्या गंजी आगीच्या भक्ष्यस्थानी.! संगमनेरच्या बाजार समितीतील गोदामांना एकाच वेळी भीषण आग..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरानजीक बाजार समितीच्या प्रांगणात असलेल्या वखार महामंडळाच्या धान्य साठवणुकीच्या गोदामांना आज रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळातच गोदामातील संपूर्ण कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वेळेत सूचना मिळूनही संगमनेर नगरपालिका आणि सहकार महर्षी थोरात कारखान्याचा टँकर उशिराने दाखल झाल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. सध्या सदरची आग आटोक्यात आणण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असून शहरात उपलब्ध असलेले दोन्ही अग्नीशमन बंब आग विझवण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहरानजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वखार महामंडळाच्या धान्य साठवणूक करणाऱ्या गोदामातील एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. त्यातच गोदामात मोठ्या प्रमाणात कापूस साठवलेला असल्याने आगीचे स्वरूप अधिक भीषण झाले. आगीच्या ज्वाळांनी गोदामावरील पत्रे अक्षरशः कस्पटासमान उडून इतरत्र पडत असल्याचे चित्र या वेळी क्षणोक्षणी दिसत आहे.
संगमनेर नगरपालिका आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचा अग्निशमन बंब गेल्या तासाभरापासून सदरची आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. मात्र कापसाच्या गंजींनीच पेट घेतल्याने एकसारखी आग धुमसत आहे. आगीचे वृत्त समजताच प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांचेसह पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर व अन्य अधिकारी घटनास्थळी हजर असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी होत असल्याने यंत्रणेला अधिक काळजी घ्यावी लागत आहे.
सदरच्या आगीचे सुरुवातीचे रौद्ररूप पाहता गोदामांमध्ये धान्याचा साठा असण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र सदरच्या गोदामांमध्ये कापसाच्या गंजी साठवून ठेवल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. त्यामुळेच आगीने काही क्षणातच भयंकर रूप धारण केले. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. या भयंकर आगीच्या भक्ष्यस्थानी गोदामात साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे.