संगमनेर तालुका पोलिसांनी पकडलेल्या टोळीकडून विविध गुन्हे उघडकीस! दहा दुचाकी, एक मोबाइल व एक वाद्य जप्त; अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमगाव बुद्रुक शिवारातील सांगवी फाटा येथे दरोडा टाकणाच्या तयारीत असलेल्या टोळीला तालुका पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (ता.14) पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास पकडले आहे. सदर पकडलेल्या चोरट्यांची पोलिसांनी सखोल चौकशी केला असता विविध गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये दहा दुचाकी, एक मोबाइल, एक वाद्य आदी साहित्य जप्त केले असून, अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी वर्तवली आहे.

याप्रकरणी तालुका पोलिसांनी आज (शनिवार ता.16) घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली आहे. तालुक्यातील निमगाव बुद्रुक शिवारातील सांगवी फाटा येथे गुरुवारी पहाटे आठ जणांची टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांना समजली होती. त्यानुसार सापळा लावत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहा.फौजदार बाळासाहेब घोडे, पोलीस हवालदार संजय बडे, म्हातारदेव जाधव, पोलीस नाईक मनोज पाटील यांच्या पथकाने सांगवी फाटा येथे अंधारात लपून बसलेल्यांपैकी तिघांना ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेऊन पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडे एक लोखंडी गज, लाकडी दांडके, मिरची पूड, रोख रक्कम पाचशे रूपये असा मुद्देमाल मिळून आला.

याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र सहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 28/2021 भादंवि कलम 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यापैकी राहुल संजय शिरसाठ (वय 24, रा.जोर्वे), किरण संजय काळे (रा.अकलापूर, ह.मु.धांदरफळ खुर्द) व एक अल्पवयीन यांना ताब्यात घेतले आहे. तर रवी संजय शिरसाठ (रा.जोर्वे), सतीष डोखे (धामणगाव आवारी, ता.अकोले), गोरख सखाराम फोडसे, आकाश फोडसे, सुरेश फोडसे (तिघेही रा.धांदरफळ खुर्द) हे पाचजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांनी निमज, निमगाव पागा, पेमगिरी, खांडगाव, जोर्वे, पिंपरणे परिसरातून दहा दुचाकी, एक मोबाइल, एक वाद्य चोरल्याची कबुली दिली आहे. सदर टोळीकडून तालुका, शहर, आश्वी, घारगाव व अकोले पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मंदिरांच्या दानपेटीची चोरी, दुचाकी चोरी, किराणा दुकान, टपर्‍या यांसह अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलीस निरीक्षक पवार यांनी वर्तवली आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी कौतुक करत तपासाबाबत मौलिक सूचना दिल्या आहेत.

Visits: 199 Today: 2 Total: 1419344

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *