संगमनेरात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघडकीस! धर्मांतरण करुन अत्याचार; सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पंधरवड्यापूर्वी घारगावमध्ये घडलेल्या कथीत ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावर सत्याचा प्रकाश पडला असून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे घारगावमधील गुटखा तस्कर युसुफ चौगुले याचे नाव समोर आले असून पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने श्रीरामपूरमधून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणातील पीडित तरुणीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांच्यासमोर कथन केलेल्या घटनाक्रमातून संगमनेर तालुक्यातही पद्धतशीरपणे अल्पवयीन मुलींना ‘प्रेमजालात’ फसवून कायदेशीर वयात येताच गुंगीच्या औषधाचा वापर करुन बळजबरीने त्यांचे धर्मांतरण केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी एकोणावीस वर्षीय पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन प्रेमजालात फसवणारा शादाब तांबोळी, या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार व पठारावरील गुटखा तस्कर युसुफ चौगुले याच्यासह चौघांवर भारतीय न्यायसंहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या सूत्रधाराला सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत घारगाव परिसरातील एकोणावीस वर्षीय पीडित तरुणीने घारगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात महिला पोलीस अधिकार्यांसमोरच पीडितेचा जवाब नोंदवला जातो. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सोनल फडोळ यांनी पीडितेशी संवाद साधून या प्रकरणामागील वास्तवाचा उलगडा गेला. 7 जुर्लैरोजी पठारभागात घडलेल्या अपहरणाच्या या घटनेने संपूर्ण तालुक्यातील वातारण तणावपूर्ण बनले होते. सदरची घटना ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप करीत बजरंग दलाने पठारभागात ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ही काढला होता. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव निर्माण झाला. पोलीस अधिक्षकांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून तपासाला दिशा दिल्यानंतर घटनेनंतर तीन दिवसांनी बुधवारी (ता.10) तिला पळवून नेणारा आरोपी शादाब तांबोळी पीडितेसह जिल्हा अधिक्षकांसमोर हजर झाले.
या संपूर्ण प्रकरणात मुलीचा शारिरीक आणि मानसिक छळ केला गेला. तिला व तिच्या कुटुंबियांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. युसुफ चौगुलेच्या इशार्यावरुन पीडितेला मंचरला बोलावून फसवून चाकणमार्गे मुंबईत नेलं गेलं. विरोध केल्यानंतर धमक्या देण्यात आल्या. पिण्याच्या पाण्यात गुंगंीचे औषध टाकून बेशुद्ध अवस्थेत मुंबईत नेण्यात आले. तेथेही अन्य लोकांच्या मदतीने दमबाजी धमक्या देवून काहीही समजत नसताना अज्ञानाचा फायदा घेवून परस्पर धर्मांतरण करण्यात आले. या दरम्यानच्या तिनही दिवस आरोपी शादाब तांबोळी याने अत्याचार केले. हा सगळा प्रकार सांगत असताना पीडित तरुणी वारंवार हुंदके देत होती. त्यावरुन तिच्यावर झालेली बळजबरी, लैंगिक अत्याचार, त्यासाठी गुंगीच्या औषधांचा वापर या गोष्टींचा किती खोलवर परिणाम झालाय याचा प्रत्यय येत होता.
पीडित तरुणी इयत्ता नववीच्या वर्गात असतानाच पठारावरील कुख्यात अवैध व्यावसायिक अशी ओळख असलेल्या युसुफ चौगुले (वय 34) याची नजर तिच्यावर पडली. धर्मांध म्हणून ओळख असलेल्या या इसमाच्या मनात तेव्हापासूनच ‘लव्ह जिहाद’चा कीडा वळवळण्यास सुरुवात झाली. त्यासाठी त्याने घारगावमधील शादाब तांबोळी या मुलाचा वापर करीत पीडितेवर वेगवेगळ्या दबाव निर्माण केला. या दरम्यान आरोपी शादाबने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर प्रेमाचे संदेश पाठवणे, फोन करणे असे प्रकार सुरु केले. जानेवारी 2020 मध्ये युसुफ चौगुले याने पीडितेला गाठून ‘शादाब खूप चांगला मुलगा आहे, तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, तु पण त्याच्यावर तसंच प्रेम केलं पाहिजे’ असे म्हणतं त्याने पीडितेला त्याच्याशी प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले.
मात्र महिन्याभरातच हा प्रकार पीडितेच्या कुटुंबियांना समजला. त्यांनी शादाबकडे याबाबत विचारणा करुन पीडितेचा पीच्छा सोडण्यास सांगितले. या महिन्याभरातच आरोपीने तिच्याशी लगड करण्याचाही प्रयत्न उरकून टाकला होता, त्यावरुन त्याचाही मनसुबा लपून रहात नाही. घरापर्यंत प्रकरण गेल्याने काहीकाळ शादाबने अधुनमधून फोन, संदेश पाठवत नातं जीवंत ठेवण्याचा पद्धतशीर प्रयोग राबवला. दहावीनंतरच्या शिक्षणासाठी 2021 साली पीडिता संगमनेरातील एका महाविद्यालयात आली आणि तेथीलच वसतीगृहातच राहु लागली. ही संधी साधून अबोला असूनही तिच्या मागावर असलेला शादाब त्याचा साथीदार कुणाल शिरोळेसह थेट संगमनेरात पोहोचला आणि त्याने वसतीगृहाबाहेरुन फोन करुन पीडितेला भेटण्यासाठी बोलावले.
बोलायचे असेल या भावनेने बाहेर आलेल्या पीडितेला शादाबचा सोबती कुणाला शिरोळे यानेही भुलथापा मारुन शादाब कसा तिच्याशी मनापासून प्रेम करतो याचे गुणगान करीत तिला भावनिक केले. त्यामुळे पुन्हा अंतरंग जागलेली पीडिता त्याच्यासोबत जवळच्याच एका ‘कॅफे हाऊस’मध्ये त्याच्याच आग्रहावरुन गेली. तेथील वातावरणाविषयी सांगायलाच नको. ‘कॅफे’च्या नावाखाली उघड ‘वेश्यालय’ चालणार्या अशाच या ‘कॅफेत’ आडोशाचा फायदा घेत त्याने तिच्या शरीराशी बळजबरीने चाळे करीत नियोजनानुसार त्याची छायाचित्रेही काढली, यावेळी पीडितेचा विरोधही त्याने धुत्कारला. पुढे याच छायाचित्रांचा वापर करुन त्याने वारंवार तिच्याशी प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी जबरदस्ती सुरु केली. त्यासाठी ती छायाचित्रे व्हायरल करण्याची, कुटुंबियांना पाठवण्याची धमकीही दिली जावू लागली.
त्याकडे दुर्लक्ष करीत पीडितेने आपले शिक्षण सुरु ठेवले व पुढील व्यावसायिक शिक्षणासाठी 2023 मध्ये तिने जुन्नर तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथील वसतीगृहात राहुनच तिचे शिक्षण सुरु असताना आरोपी शादाब युसुफ चौगुलेसह तेथे येवून ‘कॅफे’त काढलेल्या ‘त्या’ छायाचित्रांच्या आधारे तिला धमकावून लग्न करण्यास भाग पाडू लागले. सततच्या त्यांच्या जाचाला कंटाळून एकदा पीडितेने आत्महत्या करुन चिठ्ठीत नाव टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू परत करुन कायमस्वरुपी नातं संपवण्याचे ठरवले.
रविवारी (7 जुलै) पीडित मुलगी वसतीगृहाकडे जात असताना अचानक शादाब तांबोळीचा फोन आला व त्याने मंचरला येण्यास सांगितले. त्यानुसार पीडिता एसटीने मंचरला गेली असता तेथे शादाब आधीच हजर होता. त्याने पीडितेला सोबत घेत बसस्थानकाबाहेर आणलं. तेथे या प्रकरणाचा मास्टरमाईंड युसुफ चौगुले त्याच्या (एम.एच.17/बी.एक्स.0097) या अलिशान वाहनासह हजर होता. शादाबने आपण गाडीत बसून बोलू असे खोटे सांगत पीडितेला युसुफच्या गाडीत बसवले व गाडी पुण्याच्या दिशेने घेतली. त्यामुळे पीडितेने आपण मला कोठे घेवून जात आहात? अशी विचारणा करीत आपण इथेच थांबून बोलू व सोक्षमोक्ष करु असे सांगम लागली. मात्र युसुफने खेडच्या न्यायालयात वकिलाकडून लिहून घेवू असे सांगण्यास सुरुवात केल्याने पीडितेला ‘संशय’ आला. त्यामुळे तिने गाडी थांबवण्यासाठी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यामुळे युसुफसह तिच्यावर जीवापाड प्रेमाचे नाटक करणार्या शादाबने शांत रहा, नाहीतर तुझ्यासह तुझ्या सगळ्या कुटुंबाचा जीव घेवू अशी धमकीच भरली. ज्याच्याशी कधीकाळी प्रेम केलं, ज्याने प्रेमात चंद्राची किनार दाखवली त्याच प्रियकराचा खोटारडा चेहरा जेव्हा तिच्या समोर आला तेव्हा ती चक्रावली. त्याच्या फायदा घेवून युसुफने शादाबच्या मदतीने तिला पाण्यातून गुंगीचे औषधं प्यायला दिले आणि तिची शुद्ध हरपण्यास सुरुवात झाली. तेथून त्याच्याच वाहनातून चाकणपर्यंत आल्यानंतर युसुफच्या सांगण्यावरुन शादाबने अर्धवट शुद्धीवर असलेल्या पीडितेला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसर्या कारमध्ये नेले. त्या कारमध्ये चालकासह अन्य एक व्यक्ति आणि एक महिला अधीपासूनच बसलेले होते.
गाडीत कोणकोण बसलयं याचं अंधूक झालेलं चित्र बघितल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली. ज्वेह तिचे डोळे उघडले तेव्हा ते मुंबईतील एका मॉलच्या समोर होते. तिला शुद्धीत आणून आंत नेले गेले. तेथे आदिल आणि आयाज पठाण नावाचे आणखी दोघे आले. त्यातील आदिलने युसुफ चौगुलेला फोन करुन ‘हे लचांड माझ्याकडे कशाला पाठवलं?, मुलीची तब्येत खराब आहे, झंझटीचे काम होईल..’ असे सांगीतले. मात्र त्यावरही युसुफने पलिकडून काहीतरी सांगीतल्यानंतर आदिलने अन्य कोणालातरी फोन करुन पीडितेसह शादाबला नवीमुंबईतील सानपाडा भागात असलेल्या एका लॉजवर पाठवले. तेथे गेल्यावर आरोपी शादाब तांबोळी याने पीडितेवर विरोध डावलून शारीरिक अत्याचार केले.
दुसर्या दिवशी सोमवारी (ता.8) पीडितेसह शादाब पुन्हा त्या मॉलमध्ये आला त्यावेळी पीडितेने आदिल व आयाज पठाण यांना शादाबने रात्री केलेल्या अत्याचाराचा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट आयाजने तिलाच दमदाटी करीत ‘माझ्यावर कितीतरी केसेस दाखल आहेत, दोन दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलोय, जास्त बडबड केलीस तर इथेच संपूवन टाकील..’ असा दम भरल्याने पीडिता पूर्ण घाबरली. त्या दिवशी मुंबईत सर्वत्र पाऊस असल्याने पीडित आणि शादाब दोघेही दिवसभर ‘त्या’ मॉलमध्येच होते, संध्याकाळी पुन्हा सानपाड्याच्या त्याच लॉजमध्ये परतले आणि रात्रीप्रमाणेच यावेळी शादाबने तिच्यावर अत्याचार केला.
मंगळवारी (ता.9) सकाळी शादाबने पुन्हा पीडितेसह तोच मॉल गाठला. यावेळी आयाजसोबत अन्य दोन माणसं होती. त्यांनी त्या दोघांना एका वाहनातून बांद्रा येथे नेले. यावेळी तिला तेथे कशासाठी आणले आहे अशी विचारणा करताच तिला रात्रीच्या अत्याचाराची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे पीडिता घडेल त्याचा स्वीकार करु लागली. त्यानंतर काही वेळाने तीन-चार कागदांवर सह्या करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला, त्यासाठी धमक्याही देण्यात आल्या. या दरम्यान आयाज पठाण आणि शादाब तांबोळी हे दोघेही सतत या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ चौगुले याच्या संपर्कात होते. यासर्व प्रक्रियेनंतर शादाब तिला घेवून पुन्हा सानपाड्याच्या लॉजवर आला. यावेळी त्याने पीडितेला ‘तु आता माझी बायको झाली आहेस..’ असे म्हणताच तिने कसे काय? असा प्रतिसवाल केला.
त्यावर तु ज्या कागदांवर सह्या केल्यात, ती सगळी कागदं लग्ना झाल्याची असल्याचे सांगत सलग तिसर्या दिवशी पुन्हा शारीरिक अत्याचार केला. बुधवारी (ता.10) पहाटे पाच वाजता लॉजच्या व्यवस्थापकाने दरवाजा वाजवून आरोपी शादाबला उठवले व तुम्ही गाडी मागवली होती, ती खाली आल्याचे सांगितले. त्यावर शादाबने गाडीचालकाकडे विचारणा केली तेव्हा युसुफ चौगुलेने गाडी पाठवल्याचे त्याने सांगितले. मुलगी पळवल्याच्या प्रकरणावरुन संगमनेरातील वातावरण तापल्याने तुम्हाला दोघांनाही अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांसमोर हजर व्हावं लागेल असा निरोप शादाबला देण्यात आला.
यावेळी आलेल्या वाहनात आधीच दोघे बसलेले होते. त्यांनी प्रवासादरम्यान पीडितेला धमकावताना; ‘काहीही झाले तरीही पोलीस आणि तुझ्या कुटुंबियांसमोर शादाबच्या विरोधात एकही शब्द उच्चारलास तर, तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू..’ ई दमदाटी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘घारगाव पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस आणि तुझ्या नातेवाईकांसमोर काहीही झाले तरीही मला शादाब सोबतच रहायचे आहे इतकेच बोलत रहा’ अशी धमकी देण्यात आली. पोलिसांनी शादाबकडे विचारणा केली त्यावेळी आमचे लग्न झाले आहे असे त्याने खोटे सांगितल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित मुलगी अवघ्या 15 वर्षांची अल्पवयीन आहे हे माहिती असतानाही आरोपी शादाब तांबोळी याने 2020 पासून युसुफ चौगुले आणि कुणाल शिरोळे यांच्या मदतीने तिचा पाठलाग केला, प्रेमाचे आमिष दाखवले, तिच्याशी सलगी केली, तसेच, शादाब व युसुफ यांनी संगनमताने तिला फसवून मंचर येथे येण्यास सांगून युसुफ चौगुलेच्या (एम.एच.17/बी.एक्स.0097) या कारमधून पाण्यात काहीतरी गुंगीचे औषध टाकून मंचरवरुन चाकण व नंतर दुसर्या वाहनातून मुंबईत नेवून, आयाज पठाण याने धमक्या देत लॉजवर पाठवून शादाब तांबोळी याला अत्याचारास प्रोत्साहन दिले. शादाबने त्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली, आम्ही म्हणतो तसे न केल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली,
वेळोवेळी बळजबरीने, मनाच्या विरुद्ध शारीरिक व मानसिक अत्याचार केले. जीवे मारण्याची धमकी देवून धर्मांतराच्या कागदपत्रावर बळजबरीने सह्या घेतल्या. या संपूर्ण प्रकरणात शादाब तांबेाळी याच्यासह युसुफ चौगुले, कुणाल शिरोळे व अयाज पठाण यांच्या विरोधात घारगाव पोलिसांनी भारतीय न्याय कायद्यासह पोक्सोच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करीत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले यांच्या काल मध्यरात्रीच श्रीरामपूरातून मुसक्या आवळल्या असून उर्वरीत तिघेही पसार झाले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असून चाकणहून मुंबईकडे जाताना सोबत असणारी ‘ती’ स्त्री आणि तिच्या सोबतच्या अनोळखी इसमासह मुंबईतील मुख्य सूत्रधार आतिक व त्याच्या सोबतचे दोन अनोळखी इसम आणि बांद्रा येथे धर्मांतरणाची प्रक्रिया राबविणार्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे जावू शकतात. त्यातून समोर येणार्या तथ्यांवरुन ‘लव्ह जिहाद’च्या तालुक्यातील व्याप्तीसह त्यामागील परिणामकारी षडयंत्राचाही उलगडा होवू शकतो.
भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा संहितेनुसार अशाप्रकारच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये एकापेक्षा अधिक आरोपींचा समावेश असल्यास त्या सर्वांना मुख्य आरोपी इतकीच शिक्षा देण्याचे प्रावधान कलम 49 अन्वये करण्यात आले आहे, त्यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत समोर आलेला मुख्य सूत्रधार युसुफ चौगुले याच्यासह चौघांनाही शादाबने केलेल्या बलात्कारासह अन्य सर्व प्रकरणात समान शिक्षा होणार हे निश्चित असून ती आजन्म कारावासापर्यंतही असू शकते. कायदेतज्ज्ञांच्या मतानुसार नव्या कायद्यांतील तरतुदीप्रमाणे या प्रकरणात दाखल कलमान्वये आरोपींना जामीन मिळण्याची शक्यताही खूप दुर्मिळ आहे.
सदरचे प्रकरण गेल्या 7 जुलैपासून सुरु असून त्याचा शेवट संगमनेर तालुक्यात ‘लव्ह जिहाद’ची पहिली घडल्याचे वास्तव समोर आणून आता संपले आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होताच, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक निवांत जाधव यांनी या प्रकरणाचा सूत्रधार युसुफ चौगुले याच्या श्रीरामपूरात जावून मुसक्या आवळल्या व त्याला घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य आरोपीही पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांनाही अटक होईल असा विश्वास तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी व्यक्त केला.