फेब्रुवारीतील लग्न सोहळ्यांनी चौपटगतीने वाढवली तालुक्याची रुग्णगती! जानेवारीत असलेली एकेरीतील सरासरी फेब्रुवारीच्या शेवटी पोहोचली 36 रुग्ण प्रती दिवसांवर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट व हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनीकडून देशातील नागरिकांसाठी लस तयार झाल्याच्या वृत्ताने डिसेंबरमध्ये नागरिकांचा उत्साह वाढला. मात्र तत्पूर्वी नऊ महिने उनुभवलेल्या कटू अनुभवातून सावध झालेल्या नागरिकांनी नियमांची कास धरुन ठेवल्याने नववर्षात कोविडचा प्रादुर्भाव झपाट्याने खाली आला. मात्र देशासह संगमनेरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि येथूनच काही पांढरपेशांसह काही नागरिकांचा अल्लडपणा ठळकपणे समोर आला. त्यातून जानेवारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत नियंत्रणात येवू पाहणारी कोविड स्थिती बिघडली आणि त्याचा परिपाक 9.71 च्या सरासरी रुग्णवाढीवरुन आजच्या स्थितीत दररोज 36 रुग्णवाढ होवू लागली. एका महिन्यातच रुग्णवाढीचा वेग चौपट होण्यामागे अर्थातच नियमांकडे दुर्लक्ष करुन साजरे होत असलेले ‘गुपचूप’ विवाह सोहळे आणि नातेसंबंध जोपासण्यासाठी तेथे होत असलेली शेकडोंची गर्दीच कारणीभूत असल्याचे आता ठळकपणे समोर येवू लागले आहे. आपल्या कौटुंबिक आनंदासाठी अनेकांच्या जीवाशी खेळण्याच्या अशा काही घटनांवरुन आता तालुक्यात संतापही निर्माण झाला आहे.

परंपरेच्या जोखडातील समाजाने गणेशोत्सव आणि मोहरम् सारखे धार्मिक सण साजरे करताना कोविडच्या वाढत चाललेल्या प्रादुभार्वाकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा थेट आणि घातक परिणाम सप्टेंबरमध्ये पहायला मिळाला. या दोन्ही सणांसह ऑगस्टमध्ये अन्य काही उत्सवही आल्याने जणू अनिर्बंध झालेल्या समाजाने आपल्या जीवापेक्षा त्यांना अधिक महत्त्व देत उत्सवांचा आनंद लुटल्याने सप्टेंबर महिना कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजवर विक्रमी (1529) रुग्ण समोर आणणारा ठरला. सणांच्या निमित्ताने नागरिक बंधनं झुगारत असल्याचे भयानक दृष्य पाहून वैद्यकीय जाणकांरानी दिवाळीनंतर कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळणार असल्याची भाकितंही वर्तवून टाकली होती. मात्र सुदैवाने प्रशासनाचे प्रयत्न आणि नागरिकांनी त्यांना दिलेली साथ यामुळे दिवाळीनंतर येणारे संकट टळले.

त्यातच डिसेंबरमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट आणि हैद्राबादच्या भारत बायोटेक या औषध निर्मात्या कंपन्यांनी लवकरच लस उपलब्ध हाण्याच्या वार्ता दिल्याने देशात उत्साह संचारला. मात्र तोपर्यंत मनामनापर्यंत संभाव्य दुसर्या लाटेची वार्ता पोहोचली असल्याने नागरिकांनी नियमांची कास सोडली नाही. त्यामुळे लस येण्याची वार्ता धडकूही रुग्णवाढीतील सरासरी केवळ नियंत्रणातच राहीली नाही तर मोठ्या प्रमाणात खालावत जावून डिसेंबरच्या सरासरी 36 रुग्णांवरुन जानेवारीत सरासरी 9.71 रुग्ण दररोज या गतीवर येवून पोहोचली. त्याच दरम्यान 16 जानेवारीरोजी देशासह संगमनेरातही लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या तालुक्यातील नागरिकांनी कोविडचा विषाणू जणू संपल्याचा आव आणीत ‘अनलॉक’ प्रक्रियेचा मनमुराद आनंद घ्यायला सुरुवात केल्याने रुग्णगती पुन्हा वेग घेवू लागली.

त्याचा परिणाम म्हणून शासनाला पुन्हा निर्बंध जाहीर करण्याची वेळ आली आणि सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना पूर्णतः बंदी येण्यासह विवाह सोहळ्यांच्या उपस्थितीवर पूर्वीप्रमाणे मर्यादा घालण्यात आल्या. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने मंगल कार्यालये, लॉन्स व सभागृहांच्या संचालकांना नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास दंडात्मक कारवाईच्या नोटीसा बजावल्या. कारवाईच्या भितीपोटी संबंधितांनी कोविड नियमांची काटेकोर अंमलबजावणीही सुरू केली, मात्र काही अल्लड पांढरपेशे, व्यापारी आणि काही नागरिकांनी आपल्या कौटुंबिक आनंदासाठी समाजाचा जीव धोक्यात घालण्याचा जणू चंगच बांधून नियम असलेली कार्यालये टाळून यंत्रणेच्या नजरेपासून दूर असलेले रिसॉटर्स्, फार्म हाऊस अथवा आपल्या गावाकडेच ‘जंगी’ सोहळ्यांचे आयोजन केले.

अशा कार्यक्रमांची आवतणं गावभर आपल्या सग्यासोयर्यांना दिली गेल्याने नातेसंबंध टिकवण्यासाठी अनेकांना नाईलाजास्तव इच्छा नसतानाही अशा सोहळ्यांना हजेरी लावावी लागली. त्यातून जवळपास संपुष्टात येवू पाहणार्या कोविडच्या विषाणूला जणू नवसंजीवनीच मिळाली आणि जानेवारीत अगदी 9.71 या एकेरी सरासरीपर्यंत खाली आलेल्या संक्रमणाने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच वेग घेतला. या कालावधी तालुक्यातील रुग्णवाढीचा सरासरी दर 11.14 रुग्ण होता तो फेब्रुवारीच्या शेवटच्या सात दिवसांत तब्बल 35.71 इतक्या सरासरीवर जावून पोहोचला. यातून काहींचा अल्लडपणा तालुक्याला कोठे घेवून गेला याचे चित्रही दाखवून गेला. आजही कोविड संक्रमणाची वाढलेली गती टिकून आहे, नव्हे त्यात वाढच होत आहे. मात्र असे असतांनाही अनेक नागरिक नियमांच्या अधीन राहून आपल्या पाल्यांचे लग्न सोहळे उरकायला तयार नसल्याचे भयानक चित्रही सध्या तालुक्यातील ग्रामीणभागात दिसून येत आहे.

शासनाने इतर सर्व कार्यक्रमांवर संपूर्ण बंदी घालताना लग्न सोहळ्यांना मर्यादीत उपस्थितीत परवानगी दिली आहे. मात्र या सोहळ्यांना ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार नाहीत याची जबाबदारी संबंधित मंगल कार्यालय, लॉन्स अथवा सभागृहाच्या संचालकांवर सोपविली आहे. त्याचा परिणाम आधीच बुकींग केलेली मंगल कार्यालये रद्द करुन अनेकांनी अज्ञातस्थळी शेकडोंच्या उपस्थितीत सकाळी सकाळीच विवाह सोहळे आटोपण्याचा आणि तालुक्यातील कोविड स्थिती बिघडवण्याचा जणू चंगच बांधल्याचे भयानक चित्र सध्या संगमनेर तालुक्यात काही भागात दिसत आहे.

