मायलेकीने झाडावर चढून खेटलेल्या वीजवाहक तारा केल्या दूर! निमगाव पागा येथील प्रकार; मायलेकीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील निमगाव खुर्द येथे अचानक आलेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. तर वीजवाहक तारांमध्ये घर्षण होवून मोठे नुकसान झाले. हा धक्कादायक प्रकार शेतात काम करणार्या पत्रकार संजय गोपाळे यांच्या वेळीच निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ परिसरातील शेतकर्यांना मदतीसाठी हाक मारली. तोपर्यंत त्यांच्याबरोबर असणारी पत्नी व मुलीनेही मोठ्या धाडसाने झाडावर चढून एकमेकांना खेटलेल्या तारा दूर केल्या. यामुळे पुढील अनर्थ टळल्याने त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या कोरोना महामारी, वीज वितरणची वसुली मोहीम आणि बाजारभाव नसल्याने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत. त्यातही निसर्ग वेळोवेळी लहरीपणाचे दर्शन घडवत असल्याने शेतकरी पुरता संकटात बुडाला आहे. नुकतीच निमगाव पागा परिसरात अवकाळी पावसाचे हजेरी लावल्याने शेतकर्यांची तारांबळ उडाल्याची पहायला मिळाली. येथील पत्रकार संजय गोपाळे हे आपल्या शेतात काम करत असताना शेताशेजारील रोहित्रावर वादळी पावसाने झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या. यामुळे तारांचे घर्षण होवून आग लागली. त्यांनी तत्काळ परिसरातील शेतकर्यांना मदतीसाठी हाक मारली. आवाज ऐकून शेतकर्यांनीही त्यांच्या शेताकडे धाव घेतली.
![]()
प्रसंगावधान राखत सर्वांनी मिळेत त्या साधनाने आग विझवली. तोपर्यंत पत्रकार गोपाळे यांच्या पत्नी मंगल व मुलगी अक्षदा यांनी मोठ्या धाडसाने झाडावर चढून वीजवाहक तारांवर पडलेल्या फांद्या दूर सारल्या. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र रोहित्राखालील गवताने पेट घेतलेला होता. परंतु वेळीच आग विझविल्याने रोहित्र शेजारील शेतही आगीतून बचावल्याने त्यांच्या धाडसाने सर्वत्र कौतुक होत आहे.
