मसाला किंग डॉ.दातार ‘फोर्ब्ज मिडल इस्ट’च्या गौरव यादीत
नायक वृत्तसेवा, नगर
‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉ.धनंजय दातार यांना फोर्ब्ज मिडल इस्ट मासिकातर्फे नुकतेच ‘टॉप इंडियन लीडर्स इन द मिडल इस्ट 2021’ या यादीत 25 वे मानांकन जाहीर झाले आहे. पश्चिम आशियातील आघाडीच्या 100 भारतीय व्यावसायिक नामवंतांच्या या प्रतिष्ठित यादीत डॉ.दातार 27 व्या स्थानावर होते. रिटेल क्षेत्रातील कटिबद्धतेद्वारे पश्चिम आशिया क्षेत्रातील प्रगतीत योगदान दिल्याबद्दल हा गौरव आहे.
फोर्ब्जतर्फे ही यादी तयार केली जाताना संबंधित नामवंतांची नक्तमत्ता (नेटवर्थ), कार्यक्षेत्रातील त्यांचे महत्त्व व योगदान, गेल्या वर्षभरातील प्रगती व कामगिरी, रोजगार निर्मितीवर घडवलेला परिणाम, सामाजिक परिणाम व इतर कंपनी सामाजिक जबाबदारी उपक्रम यांचा विचार केला जातो. डॉ.दातार यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच गेल्या वर्षात सामाजिक बांधीलकीचे स्तुत्य प्रयत्न केले आहेत. कोविड साथीदरम्यान जून 2020 मध्ये दुबईत अडकून पडलेल्या व मायदेशी परत जाऊ इच्छिणार्या रोजगार वंचित गरजू भारतीयांना त्यांनी स्वखर्चाने विमानाची तिकिटे काढून दिली. कोविड साथीप्रमाणेच अन्य कारणांनीही संकटात सापडलेल्यांना आमच्या समूहाने मदत केली. या मोहिमेचा गौरवपूर्ण उल्लेख फोर्ब्ज मिडल इस्टकडून करण्यात आला आहे.
फोर्ब्ज मिडल इस्टने माझ्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या प्रतिष्ठित यादीत मानांकन दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. खरंतर गेले वर्ष कोरोना साथीमुळे सर्वांसाठीच खडतर ठरले आणि उद्योग क्षेत्राच्या वाटचालीवरही विपरीत परिणाम झाला. माझ्या अल अदील कंपनीने हे आव्हान पेलताना सामाजिक बांधीलकीचाही विसर पडू दिला नाही. या प्रयत्नांत माझे कुटुंबीय, कर्मचारी व ग्राहकांची मोलाची साथ मला लाभली. फोर्ब्जचे मानांकन ही एकप्रकारे प्रोत्साहनाची पाठीवरील थाप असून कामाचा हुरूप वाढवणारी आहे.
– डॉ.धनंजय दातार (अध्यक्ष-अल अदील ट्रेडिंग)