मॉडर्न हायस्कूल 70 वर्षांचे झाले…!

1 मार्च, 1951 रोजी मॉडर्न हायस्कूलची स्थापना झाली. याला आज 70 वर्षे पूर्ण होत आहेत. एखादी शाळा 70 वर्षांची होते ही सामान्य घटना नसते. ती एक मूकक्रांती असते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अवघ्या 4 वर्षाने स्थापन झालेल्या या शाळेने स्वातंत्र्यांचे सुराज्य करण्याच्या प्रयत्नात शाळेने स्वातंत्र्यासोबत वाटचाल केली आहे. किंबहुना हिंद सेवा मंडळ ही संस्थाच मुळी राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी गांधीजी व टिळकांच्या प्रेरणेने 100 वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये स्थापन झालेली आहे.

अकोले तालुक्याच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासात शाळेने एक वेगळे योगदान दिले आहे. त्याची चर्चा सत्तरीच्या निमित्ताने करायला हवी. स्वातंत्र्यानंतर सर्वच ठिकाणी शाळांची संख्या कमी होती. आज 100 हायस्कूल असलेल्या अकोले तालुक्यात तर तेव्हा एकही हायस्कूल नव्हते. त्याचा परिणाम विकासावर होत होता. त्यामुळे आज तालुक्यात विस्तारलेल्या शिक्षणात महत्त्वाचे योगदान या शाळेने दिले असे नम्रपणे नोंदवावेसे वाटते. खेड्यापाड्यातील विद्यार्थी शिकू लागले की त्या कुटुंबाचे आर्थिक वर्ग बदलतात. कितीतरी कुटुंबातील हायस्कूलमध्ये शिकणारी पहिली पिढी मॉडर्न हायस्कूलमधून पुढे गेली. वसतिगृहामुळे आदिवासी विद्यार्थीही शाळेत येऊ लागले. यातून अनेक घरात पुढील शिक्षण घेण्याला गती मिळत गेली. या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने अनंतराव देशपांडे (सर) दत्तो वामन पोतदारांपासून कुसुमाग्रजापर्यंत महाराष्ट्रातील सर्व प्रथितयश साहित्यिक, विचारवंत अकोले सारख्या तेव्हाच्या दुर्गम छोट्या गावांमध्ये आणले हे आज खरेही वाटणार नाही. पण त्याचे संस्कार गावाच्या सांस्कृतिक जीवनावर नक्कीच झाले आहेत. लेखक होणे ही प्रेरणा माझ्यासारख्या अनेकांच्या मनात विद्यार्थी असतानाच कोरली गेली. शाळा गावच्या सांस्कृतिक परिघावर मूकपणे असे खूप काही करून जात असते.

या शाळेचे गाजलेले मुख्याध्यापक फडके (सर) हे तर जणू काल अकोल्यातून गेले. अशा आठवणी करणारे माजी विद्यार्थी भेटतात तेव्हा मन भरून येते. मध्यंतरी एका छोट्या गावात गेलो. एका गृहस्थांनी फडके सरांविषयी भरभरुन आठवणी सांगायला सुरुवात केली. तेव्हा एखादा शिक्षक हा निवृत्तीनंतरही त्या परिसरावर कसे गारूड करतो हे अनुभवायला आले. फडके सरांच्या तर आज 50 वर्षांनंतरही आठवणी काढणारे विद्यार्थी भेटतात. या शाळेचे अनेक नामवंत शिक्षक तालुक्यात आजही चर्चिले जातात. त्यांच्या आठवणी अनेक विद्यार्थी काढतात हे भाग्य फक्त शाळा आणि शिक्षकांनाच त्यांच्या आयुष्यात मिळते.

या शाळेने अनेक लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, राजकीय नेते घडवले. अनेकजण परदेशात आहेत, सैन्यात आहेत आणि समाजभान असलेले हजारो नागरिक घडवले हे जास्त महत्वाचे वाटते. एका शाळेच्या आयुष्यात 70 वर्षांत अनेक मुख्याध्यापक, शिक्षक अनेक कर्मचारी विद्यार्थी येतात आणि जातात पण शाळा तशीच उभी असते. पुढे पुढे जात राहते. प्रवरा नदी आणि ही शाळा शेजारी शेजारी आहेत. सारख्याच प्रवाही, पांथस्थ आणि विद्यार्थ्यांना सारख्याच समृद्ध करणार्‍या A college is made by men,not by buildings and football records.. असे म्हटले जाते. शेवटी शाळा म्हणजे फक्त इमारत नसते, शाळा म्हणजे त्या शाळेने मिळवलेली बक्षिसे नसतात तेथे असलेली जिवंत माणसे असतात. तालुक्याच्या सांस्कृतिक भावनिक शैक्षणिक विश्वाशी अभिन्नपणे जोडलेल्या 70 वर्षांच्या या समर्पित योगदानाबद्दल आपण कृतज्ञतेने या शाळेला अभिवादन करूया!
– हेरंब कुलकर्णी (माजी विद्यार्थी, मॉडर्न हायस्कूल अकोले)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *