मानाच्या झेंड्याचे महंत बालब्रम्हचारींच्या हस्ते पूजन

नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा नगरीचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मोहिनीराजांची यात्रा कोरोना महामारीमुळे यावर्षी रद्द करण्यात आली असली; तरी यात्रौत्सवाच्या निमित्ताने नेवासा बुद्रुक येथील कुटे परिवारातील मानाच्या झेंड्याचे पूजन महंत बालब्रम्हचारी महाराजांच्या हस्ते करण्यात येऊन मानाचा पहिला झेंडा रविवारी (ता.28) श्री मोहिनीराजांच्या मंदिरावर चढविण्यात आला.

यावेळी सिद्धेश्वर मंदिर देवस्थानचे प्रमुख महंत 1008 श्री बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते विधीवत ध्वजपूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. यावेळी कुटे परिवाराच्यावतीने संजय कुटे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. उपस्थित महिलांच्यावतीने ध्वजाला पंचारती ओवाळून औक्षण करण्यात आले. यावेळी पिंकू गोंजारी व भक्ती रहाट या कन्यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळीबद्दल बालब्रम्हचारी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच बाबा कांगुणे, संभाजी ठाणगे, माजी उपसरपंच अजित जाधव, सतीश भाकरे, कैलास खंडागळे, सीताराम नवले, नारायण चव्हाण, सोपान शेंडे, संजय कुटे, सत्यवान कुटे, शेषराव कुटे, राजेंद्र कुटे, किरण कुटे, अशोक कुटे, राहुल कुटे, संतोष कुटे, आलोक कुटे, अभिषेक कुटे, कल्याण कुटे, तुषार कुटे उपस्थित होते.
