चांदा येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या 27 गोवंश जनावरांची सुटका! सोनई पोलिसांची कारवाई; तिघांना अटक, दोघ पसार तर 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील चांदा येथे सोनई पोलिसांनी मंगळवारी (ता.31) रात्री अवैधरित्या कत्तलखान्यासाठी जनावरे घेऊन जाणार्‍यांवर मोठी कारवाई करत 27 गोवंश जनावरे व 2 वाहने असा 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली. यात दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले असून, अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत सोनई पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (ता.31) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व अंमलदारांनी चांदा येथे कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला असता काही इसम हे त्यांच्याकडील आयशर टेम्पो व महिंद्रा पिकअपमध्ये गोवंशीय जनावरे भरत असताना मिळून आले. टेम्पोमध्ये सात ते आठ जनावरे व महिंद्रा पिकअपमध्ये चार जनावरे आखूड दोरखंडाने बांधलेली होती.

काही जनावरे ही वाहनांना आखूड दोरखंडाने बांधलेली व काही जनावरे ही जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अव्यवस्थितपणे आखूड दोरखंडाने बांधलेली मिळून आली. गायी व गोर्‍हे असे दोन्ही वाहनांमध्ये खचाखच भरलेली होती. वाहनांच्या बाजूला देखील काही गुरे बांधलेली आढळून आली. यावेळी तिघांना पकडले तर दोघे साथीदार पसार झाले. त्यांच्याकडून 11 लाख रुपये किंमतीचे 27 गोवंशीय जनावरे आणि वाहतुकीसाठी उपयोगात आणलेली वाहने आयशर टेम्पो (क्र.एमएच.16, सीसी.8594) व पिकअप (क्र.एमएच.17, बीडी.112) असा एकूण 18 लाख 83 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी सोनई पोलिसांत हवालदार ज्ञानेश्वर आघाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अजहर ताहिर शेख (वय 29, रा. कुरेशी मोहल्ला), जुनेद अब्बास शेख उर्फ कुरेशी (वय 21, रा. सुमित्रा कॉलनी, निराला बजार औरंगाबाद), भगवान विष्णू धुमाळ (वय 47, रा. चांदा) अशी अटक केलेल्यांची नावे असून इर्शाद कादिर शेख (रा. चांदा), शनि पठाण (रा. चांदा) हे पसार झाले आहेत. यांच्यावर गुरनं. 295/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम 1995 चे कलम 5, 4 (क) सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम 1960चे कलम 11, मोटार वाहन कायदा कलम 192 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केलेेे असता 3 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

अटक केलेल्यापैकी जुनैद शेख उर्फ कुरेशी याचे यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. चांदा येथून मुक्तता केलेल्या जनावरांना जय गोमाता सेवाभावी संस्था वृध्देश्वर मढी (ता. पाथर्डी) येथे सुरक्षितरित्या पाठविण्यात आले. सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्दशन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, हवालदार गायकवाड, दत्ता गावडे, अडकित्ते, पोलीस नाईक बाबा वाघमोडेे, नाना तुपे, पोलीस शिपाई जावळे, मोरे, जवरे, विठ्ठल थोरात आदिंनी केली.

Visits: 3 Today: 1 Total: 30095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *