शिवभक्तांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था उभारणार : डॉ. शिंदे धारकर्‍यांची पावनखिंड वारी; संगमनेरातून 100 धारकरी सहभागी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
साडेतीनशे वर्षांपूर्वी घडलेला पराक्रमी इतिहास अनुभवण्यासाठी देशभरातून हजारो युवा वर्ग (धारकरी) पन्हाळगड-पावनखिंड वारीत भर पावसात सहभागी होत असतात. या शिवभक्तांची ठिकठिकाणी राहण्याच्या सुसज्ज व्यवस्थेसह पूर्णपणे आराखडा तातडीने मार्गी लावला जाईल, असे आश्वासन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले. पन्हाळगड-पावनखिंड विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्यावतीने आयोजित पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. वसंत मोरे होते. दरम्यान मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. यावेळी नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याचे व वीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन झाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी इतिहास घडवला. कैक मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. पावनखिंडचा रणसंग्राम हा एक इतिहासातील महत्त्वाचा अध्याय आहे. वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद, बांदल सेना यांनी आपला पराक्रम गाजवून इतिहासात आपले नाव अजरामर केले. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटण्यासाठी धो धो प्रचंड कोसळणार्‍या पावसातून महाराजांनी विशाळगड जवळ केला. दरम्यान वीर शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, कृष्णाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंग जाधव यांनी स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. स्वराज्यावरची काय निष्ठा असते ती या शूरवीर मावळ्यांकडून शिकावी. त्यांचा अजरामर इतिहास तरुणांपर्यंत नेण्याचे काम शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र परिवारचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे व त्यांचे सर्व सहकारी गेल्या 30 वर्षापासून करतात हे अभिमानास्पद आहे.

शिवराष्ट्र परिवार तरुणांना आयुष्यात जगण्याची चांगली दिशा देत आहे. अशा मोहिमांमध्ये सहभागी होऊन तरुणांनी राष्ट्र घडवण्यासाठी मोठे योगदान देणे आवश्यक आहे. पावनखिंड मार्गावर दरवर्षी जाणार्‍या शिवभक्तांसाठी पन्हाळगड, खोतवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, पांढरेपाणी आणि भातळी येथे सुसज्ज दोन मजली सभागृह बांधले जाईल. या पन्हाळगड- पावनखिंड विकास आराखड्यास नुकत्याच कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना कार्यवाही करण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. पुढील वर्षी ही व्यवस्था सर्व शिवभक्तांना उपलब्ध असेल. पन्हाळगडावर बांदल सेनेचे शिल्प उभा करण्याचेही आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्यमंत्री वैद्यकीयचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी इतिहासासह पावनखिंड मोहिमेमागचा उद्देश विशद केला. या मोहिमेत वीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सेनापती कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे, बाळासाहेब सनस, करण झावणे-पाटील, मोहीम प्रमुख गणेश कदम, विनायक जरांडे, मोहन खोत, राजेंद्र पवार, विराज साळुंखे, अभिजीत चव्हाण, ऋतुराज चौगुले, शुभम चौगुले, रमेश जाधव, विजय खोत, गजानन परीट, विक्रांत भागोजी, उमेद रजपूत, अभिजीत पवार, अतुल कापटे, दीपक कर्पे, संतोष शेळके, सुखदेव इल्हे, डॉ.महादेव अरगडे, नंदू रहाणे, भूपाल शेळके, विलास शिरोळे यांसह देशभरातून 700 हून अधिक धारकरी सहभागी झाले आहेत.

Visits: 148 Today: 1 Total: 1104791

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *