नगर-मनमाड महामार्गाने पुन्हा एकदा घेतला तरुणाचा बळी! डोळ्यादेखत भावाचा मृत्यू झाल्याने बहिणीने केला आक्रोश

नायक वृत्तसेवा, राहाता
अत्यंत रहदारी असणार्‍या नगर-मनमाड महामार्गाच्या दयनीय अवस्थेने पुन्हा एकदा बहिणीला दुचाकीवरुन शिर्डीला घेऊन येताना खड्ड्याने बळी घेतला आहे. मालवाहतूक वाहनाच्या मागच्या चाकाखाली सापडून शिर्डीतील वीसवर्षीय तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता.23) सावळीविहीर शिवारातील दोडिया हॉस्पिटलजवळ घडली आहे. यानंतर भावाच्या मृत्यूने बहिणीने एकच आक्रोश केल्याचे दृश्य पहायला मिळाल्याने उपस्थित सर्वजण सून्न झाले होते.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी तीन वाजेच्या सुमारास मोठ्या बहिणीला वैजापूरहून रोशन राजेंद्र गुजर (वय 22) हा तरुण दुचाकीवरून शिर्डीकडे घेऊन येत होता. याच दरम्यान मनमोकळा संवाद साधत असताना दोडिया हॉस्पिटलजवळ नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे मालवाहतूक वाहनाचा (आरजे.14, सीजे.2687) हलकसा धक्का बसला. यामुळे थेट मालवाहतूक वाहनाच्या मागच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील तरुणाला सुमारे पंधरा ते वीस फुटांपर्यंत फरपटत नेले. यावेळी बहिणीने एकच आक्रोश केला. त्यावेळी उपस्थित सर्वजण सून्न झाल्याचे पहायला मिळाले.

या अपघाताची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दातरे, वैभव रुपवते, पोलीस नाईक गणेश सोनवणे यांना समजताच त्यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी रोशनला साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. परंतु, उपचारांपूर्वीच मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाचा याच महामार्गाने बळी घेतला होता. त्यातच पुन्हा ही घटना घडल्याने महामार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करुन निष्पापांचे बळी वाचवावेत अशी आर्त विनवणी नागरिकांसह वाहनचालक करत आहे. किमान आता तरी संबंधित विभागाने जागे होवून महामार्गाची दुरुस्ती करावी. अन्यथा महामार्गावरील अपघातांची श्रृंखला कायम राहून बळीही जातील यास संबंधित विभागच जबाबदार राहील.

Visits: 14 Today: 1 Total: 118640

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *