अखेर ‘बनावट’ रेमडेसिविर प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश! संगमनेरातील ‘त्या’ रुग्णालयातील प्रकाराबाबतच्या दैनिक नायकच्या वृत्तावर ‘विश्वासार्हते’ची मोहोर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात

कोविड संक्रमणाची दुसरी लाट शिखरावर असतांना रुग्णांसाठी ‘संजीवनी’ ठरविल्या गेलेल्या रेमडेसिविर लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्याचा परिणाम या लशीचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होण्यासह बनावट लशींचीही विक्री सुरु झाली होती. संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात असाच धक्कादायक प्रकार घडला होता, मात्र सदर रुग्णालयाला अशा भयानक प्रसंगातही आपल्या नैतिक जबाबदारीचा विसर पडल्याने त्यांनी बनावट लशीचा प्रकार उघड होवूनही याबाबतची माहिती दडवून ठेवली होती. मात्र हा प्रकार समजताच ‘बांधिलकी जनहिताची’ या तत्त्वानुसार दैनिक नायकने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली. त्यावरुन संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांच्या आदेशान्वये तहसीलदारांनी केलेल्या चौकशीत सदरच्या वृत्तावर ‘विश्वासार्हते’ची मोहोर उमटली आणि अखेर संगमनेरातील ‘बनावट’ रेमडेसिविर प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या 9 मे रोजी संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या 57 वर्षीय रुग्णासाठी त्याच्या पत्नीने त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर एका मोबाईल क्रमांकावर फोन करुन रेमडेसिविर लस मागवली होती. त्यावेळच्या परस्थितीनुसार संपूर्ण देशातच रेमडेसिविरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने सामान्य स्थितीत ती लस उपलब्ध होणे जवळपास अशक्य होते. मात्र आपल्या पतीसाठी वाट्टेल ती किंमत देण्याची तयारी ठेवून सामान्य कुटुंबातील त्या महिलेने तब्बल 30 हजार रुपये मोजून ती लस मिळविली. त्यानंतर रुग्णालयातील परिचारिकेने ‘त्या’ रुग्णाला प्रत्यक्षात लस देताना ‘ती’ बनावट असल्याचे संबंधित महिलेला सांगितले, त्यावरुन तेथे मोठा गदारोळ झाला. शेवटी संबंधित रुग्णाच्या पत्नीने ज्या मोबाईल क्रमांकावरुन सदरची लस मागवली होती, त्यावर पुन्हा फोन करुन लस बनावट असून पैसे परत देण्याची मागणी केली आणि तसे घडलेही.

मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यासह तालुक्यात दररोज उच्चांकी रुग्ण समोर येण्याची श्रृंखला सुरु असतांना संगमनेरात रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर सारख्या अचानक महत्त्व वाढलेल्या औषधांचा सर्वत्रच तुटवडा झाल्याने अनेक रुग्णांचे बळी गेले, तर अनेकांना मृत्यूशी कडवा संघर्ष करावा लागला. या सर्व गोष्टी माहिती असतांनाही आपल्या रुग्णालयात इतका गंभीर प्रकार घडूनही ना त्या रुग्णालयाच्या संचालकांनी पोलीस अथवा प्रशासनाला कळविले, ना त्यांच्या रुग्णालयातील कोणा आरोग्य सेवकाने. विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती घेतांना ‘आम्ही सदर रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिविर आणायलाच सांगितले नव्हते’ असेही उत्तर ऐकण्यास मिळाले. जर उपचार करणार्या डॉक्टरांनी लसच आणायला सांगितली नव्हती तर मग रुग्णालयातील कर्मचारी कोणाच्या सांगण्यावरुन आणलेली लस देण्याची तयारी करीत होते, ज्यातून ती बनावट असल्याचे समोर आले हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीत आहे. अर्थात सदर रुग्णालयाने कोविड संक्रमणाच्या काळात संगमनेरकरांच्या आरोग्यासाठी चांगले काम केले असल्याने या प्रकरणात त्यांचा कोठेही संबंध असल्याचे आमचे म्हणणे नाही.

दैनिक नायकच्या वृत्तामधून गेल्या 13 मे रोजी या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर संबंधित रुग्णालयाच्या संचालकांनी उपविभागीय अधिकार्यांकडे लेखी पत्राद्वारा दैनिक नायकबाबत तक्रार केली. त्यांनी त्याची चौकशी करुन पुढील कारवाई करण्याबाबत तहसीलदारांना आदेशित केले. त्यानुसार संबंधित रुग्णालयाचे म्हणणे आणि दैनिक नायकने सादर केलेले पुरावे यांची चौकशी केल्यानंतर नायकच्या ‘त्या’ वृत्तावर विश्वासार्हतेची मोहोर उमटली. त्यातच ‘ते’ बनावट रेमडेसिविर विकत घेणार्या रुग्णाच्या पत्नीनेही आपले म्हणणे सादर करतांना असा प्रकार घडल्याचे सांगितल्याने त्यांच्याच तक्रारीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपासही सुरु केला आहे. या प्रकरणाची चौकशी करणार्या तहसीलदारांनी याबाबतचा अहवालही उपविभागीय अधिकार्यांना सोपविला असून पोलिसांनाही पत्रव्यवहार करुन या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.

गेल्या पंधरवड्यात संपूर्ण देशातच अघोषीत आणीबाणी सारखी स्थिती निर्माण झाली होती. दररोजची प्रचंड रुग्णसंख्या, त्यांच्यासाठी खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन, रेमडेसिविर सारख्या गोष्टींचा मोठा तुटवडा, त्यामुळे सामान्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फरपट अशा गोष्टींनी तो कालावधी अक्षरशः भयानक ठरला. अशा काळातच 900 रुपयांची लस तब्बल 30 हजार रुपयांना विक्री होत असल्याची गंभीर गोष्ट समोर आली. खरेतर संबंधित रुग्णालयानेच हा प्रकार चव्हाट्यावर आणला असता तर राज्यभर त्यांचे नाव झाले असते, मात्र त्यांनी ‘आमच्याकडे असे घडलेच नाही’ अशी आश्चर्यकारक भूमिका घेवून चालून आलेली सुवर्णसंधी दवडली. दैनिक नायकने अगदी सुरुवातीपासूनच समाजाशी बांधिलकी ठेवली आहे, प्रसंगी सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी अनेकांशी वैरत्त्वही प्राप्त केले आहे. मात्र तरीही आम्ही समाजाशी, समाजाच्या शेवटच्या घटकाशी बांधिल होतो आणि आहोत हेच या प्रकरणातून अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसून आले आहे.

गेल्या पंधरवड्यात देशभरासह संगमनेरातही उच्चांकी दराने ‘रेमडेेसिविर’ लशीची विक्री झाली. विशेष म्हणजे राज्यात सर्वप्रथम बारामतीतून बनावट रेमडेसिविर विक्रीचा भांडाफोड झाला आणि त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी त्याचे लोण पसरले. संगमनेरातील प्रकारही त्याच धाटणीतला आहे. बनावट पद्धतीने तयार केलेले मिश्रण रेमडेसिविरच्या नावाखाली तब्बल 30 हजारांना विकण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. अशा प्रकारच्या बनावट औषधांमुळे रुग्णाचा जीव जाण्याचीच अधिक शक्यता असते. संगमनेरात अशा किती बनावट लशींची विक्री झाली? त्यांचे उत्पादन कोठे होते? त्याच्या पुरवठ्याची साखळी कशी आहे? अशा अनेक प्रश्नांची उकल होवून बोगसगिरीचा हा धंदा समूळ बंद होण्यासाठी पोलिसांनी या प्रकरणाच्या मूळाशी जावून तपास करण्याची गरज आहे.

