विवाहित तरुणास टोळक्याची बेदम मारहाण

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे मागील भांडणाच्या कारणातून विवाहित तरुणास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.24) घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी (ता.26) घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आप्पाजी बाबाजी देवकर (वय 25, रा.जांबुत बु. धनगर वाडा) यांचे पत्नीसोबत दोन महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तेव्हापासून पत्नी माहेरी गेलेली होती. या कारणावरुन रामदास बाळू खेमनर, योगेश रामदास खेमनर, संदेश चिलाप्पा खेमनर, बाबाजी लहानू खेमनर, पिंटू खेमनर व इतर चार-पाच जणांनी (सर्व रा.चिंचेवाडी, साकूर) रागातून आप्पाजी देवकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तर संदेश खेमनर याने देवकर यांच्या अवघड जागी लाथाने मारहाण केली आणि योगेश खेमनर याने दगडाने पाठीवर मारहाण केली. सध्या जखमीवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत आप्पाजी देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी गुरनं.72/2021 भादंवि कलम 325, 324, 143, 147, 149, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य हवालदार सुरेश टकले हे करत आहे.

Visits: 152 Today: 1 Total: 2123742

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *