डॉ. दातार यांच्या ‘मसालाकिंग : ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ आत्मचरित्राचे प्रकाशन सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत प्रकाशन

नायक वृत्तसेवा, नगर
दुबईस्थित मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या अल-अदील समूहाच्या 38 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दुबईतील ड्रेस हॉटेलमध्ये शानदार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस डॉ. दातार यांनी लिहिलेल्या ‘मसालाकिंग : ए जर्नी ऑफ मेमॉयर्स’ या इंग्रजी आत्मचरित्राचे प्रकाशन प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते व केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये झाले.

याप्रसंगी डॉ. धनंजय दातार यांच्या पत्नी वंदना, पुत्र हृषीकेश आणि रोहित यांसह दुबईतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अल-अदीलचा कर्मचारी वर्ग व ग्राहक उपस्थित होते. सुरेश वाडकर यांच्या मधुर गीतांनी सजलेला हा कार्यक्रम दुबईकरांसाठी अविस्मरणीय ठरला. आत्मचरित्राच्या निमित्ताने अल-अदील समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी आजवरच्या प्रवासातील स्मरणीय आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, माझे बालपण गरीबीत गेले. दहावीला मी गणितात पाचवेळा नापास झालो. शाळेत असताना फावल्या वेळात मी चिंचा-बोरे विकायचो आणि पुढे महाविद्यालयीन जीवनात अभ्यास सांभाळून मुंबईच्या उपनगरांत फिनेल, इन्स्टंट मिक्स अशी उत्पादने विकली. माझ्या वडिलांना अखेरच्या नोकरीत दुबईतील कंपनीतून निवृत्त होण्याच्या उंबरठ्यावर त्यांना व्यवसायाची संधी दिसली. दुबईत कामानिमित्त गेलेल्या भारतीयांना त्यांच्या रोजच्या खाण्यातील पिठे, मसाले, लोणची, चटण्या तेथे सहज मिळत नाहीत हे लक्षात येताच त्यांनी एक लहानसे दुकान उघडले.

एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. त्या आईच्या शब्दांनी माझ्यात जिद्द जागवली. विविध समाजांतील लहान व्यावसायिकांनी मला व्यवसायातील खाचा-खोचा व कानमंत्र शिकवले. आयुष्यात कोणतेही काम छोटे-मोठे नसते व आपले पूर्वग्रह धंद्यात आणून चालत नाही, हा मोलाचा उपदेश मला एका जैन व्यापार्याने केला तर कष्ट आणि कौशल्य कधीही वाया जात नाही, ही शिकवण मला मुल्लाचाचा नामक व्यापार्याने दिली. कष्ट, सातत्य, संयम यामुळे मी व्यवसाय विस्ताराच्या संधीही साधल्या. त्यामुळे मी आखाती देशांमध्ये आजवर 50 सुपर स्टोअर्सची साखळी विणू शकलो. व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सुरक्षित, शुद्ध व भेसळमुक्त उत्पादने तसेच सौजन्यपूर्ण सेवा देऊन ग्राहकांना काटेकोरपणे जपावे. कारण अखेर तेच आपल्याला नाव व कीर्ती मिळवून देतात. मला दुबईच्या शासकांनी ‘मसालाकिंग’ हा बहुमान देऊन गौरवले यामागे माझे कर्मचारी, ग्राहक यांचा विश्वास कारणीभूत आहे. यश व समृद्धीचे स्वप्न बघणार्या भारतीय सर्वसामान्य तरुणांमधून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत हे माझे स्वप्न आहे. अशा नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी हे आत्मचरित्र लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
![]()
दुबईमध्ये 38 वर्षांपूर्वी वडिलांनी थाटलेल्या लहानशा किराणा दुकानात मदत करायला मी भारतातून आलो तेव्हा माझ्या खिशात 10 दिर्हॅमच्या केवळ 3 नोटा होत्या. या कर्मभूमीने माझी खडतर परीक्षा घेतली आणि त्या कसोटीला उतरताच भरभरुन देऊही केले. जिद्द, कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य व ग्राहकसेवा या पंचसूत्रीमुळेच मला व्यवसायात उत्तुंग यश लाभले आणि एका सामान्य दुकानदारापासून ते मसालाकिंग बनण्यापर्यंत माझा प्रवास झाला.
– डॉ. धनंजय दातार (मसालाकिंग)
