नराधम पित्यानेच चिमुकलीवर अत्याचार करुन टाकले विहिरीत! ब्राह्मणी येथील धक्कादायक घटनेने अहमदनगर जिल्ह्यासह राज्य हादरले
नायक वृत्तसेवा, राहुरी
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यासह राज्य हादरले आहे. ऊसतोडीसाठी आलेल्या एका कुटुंबातील साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची फिर्याद शुक्रवारी (ता.12) रात्री तिच्या बापाने पोलिसांत दिली होती. मात्र, निर्दयी बापाच्या संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटू शकल्या नाहीत. महिला पोलिसांनी चिमुकलीच्या आईला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बापानेच स्वतःच्या लेकीवर अत्याचार करुन तिला विहिरीत ढकलून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चिमुकलीच्या आईचे घटनेपूर्वी नवर्यासोबत कडाक्याचे भांडण झाल्यावर रात्री साडेदहा वाजता नराधम पिता मुलीला घेऊन बाहेर गेला. रात्री 11 वाजता एकटाच घरी परतला. मुलीबाबत विचारणा केल्यावर शोधायला लागला, असे त्या चिमुकलीच्या आईने सांगितले. मुलीचे अपहरण झाले असा तो पोलिसांना सांगत होता. या प्रकरणात मुलीच्या अपहरणाचाच गुन्हा नोंदवा, असा त्या नराधमाचा आग्रह होता. मुलीबरोबर असणारी शेवटची व्यक्ती म्हणून पोलिसांनी नराधम बापाला सोवमारी (ता.15) रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान, बालिकेचा मृतदेह अहमदनगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल काल प्राप्त झाला. त्यात या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लगेच पोलिसांनी नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या. चिमुकलीसोबत अत्याचार करून तिला विहिरीत ढकलून दिले. त्यातच तिचा मृत्यू झाला. आपले दुष्कृत्य लपविण्यासाठी मग त्यानेच पोलिसांत खोटी फिर्याद दिली. मुलीच्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र, मुलीच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अहवालात सर्व बाबी स्पष्ट झाल्यावर राहुरी पोलिसांनी मंगळवारी (ता.16) रात्री उशिरा नराधम बापाला बेड्या ठोकल्या. याबाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं 144/2021 नुसार भा.दं.वि. कलम 302, 377, 201, 177 सह पोस्को 4 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
मृत बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात म्हटले आहे. व्हिसेरा राखून ठेवला आहे. घटनेच्या दिवशी व मृत पीडित बालिकेबरोबर शेवटची व्यक्ती तिचा बापच होता. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केली आहे.
– संदीप मिटके (पोलीस उपअधीक्षक-श्रीरामपूर)