रस्त्याचे काम झाल्यानंतरही छत्रपतींचे स्मारक पाण्यातच? पालिकेचे ‘गटार अख्यान’ चर्चेत; व्यापार्यांनी मात्र काम बंद पाडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनेक वर्षांनंतर सांडपाण्याच्या भूमीगत व्यवस्थेअंतर्गत कामाला मुहूर्त गवसलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते जूना कटारिया कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याचे काम वादात सापडले आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरील बहुतेक भागातील पाण्याचा निचराच होत नसल्याने व्यापार्यांसह पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर येथील व्यापार्यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांनाही याबाबत अवगत केले होते. मात्र या उपरांतही सांडपाणी निचर्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था करण्यात आलेली नाही. अशा स्थितीत शुक्रवारी पालिकेच्या ठेकेदाराने चढ-उताराच्या पातळीचा विचार न करता या रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात केली होती. मात्र त्याच्या या कृतीने संतप्त झालेल्या व्यापार्यांनी सांडपाणी निचर्याची व्यवस्था झाल्याशिवाय रस्त्याचे काम होवू देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे ठेकेदाराला हात हलवत परतावे लागले. याबाबत पालिकेला निवेदन देण्यात आले असून तो पर्यंत काम सुरु न करण्याची विनंती करण्यात आली आहे.

शहरालगतच्या बहुतेक उपनगरांना गावठाणाशी जोडणारा प्रचंड वर्दळीचा आणि व्यावसायिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा रस्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कटारिया कॉर्नरपर्यंतचा रस्ता ओळखला जातो. अरुंद आणि व्यापारी प्रतिष्ठानांनी गजबजलेल्या या रस्त्यावरुन दररोज हजारो नागरिकांची वर्दळ सुरु असते. पादचारी, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा सगळ्या प्रकारची वाहतूक सहन करणार्या या रस्त्याच्या खालून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाईप टाकण्यात आले आहेत. गेल्याकाही महिन्यांपासून सुरु असलेल्या या कामामुळे हा संपूर्ण रस्ता उखडलेल्या स्थितीत असून जागोजागी गटाराचे चेंबर जमीनीवर आल्याने दुचाकीस्वारांसह पादचार्यांची मोठी कसरत सुरु आहे.

शहरातंर्गत कामे करताना प्रत्येक रस्त्याचे महत्त्व लक्षात घेवून कालबद्ध पद्धतीने ती पूर्ण व्हावीत असे साधारण अपेक्षित असते. संगमनेरात मात्र अशा गोष्टींची वाणवा असल्याने पालिकेचा बांधकाम विभाग आणि ठेकेदार या दोघांच्या संगनमतामधून तयार होणार्या सोयीस्कर नियमांचेच येथे पालन केले जाते. त्याचा प्रत्यय प्रचंड वर्दळ असलेला हा रस्ता गेल्या दीर्घकाळापासून घेत आहे. कोणतेही नियोजन नसल्याप्रमाणे गेल्या तीन-चार महिन्यांपासून हा अतिशय महत्त्वाचा रस्ता वारंवार खोदला गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य असून दिवसांतील बहुतेक वेळ धुळ झटकण्यातच जात असल्याने व्यापार्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने दीर्घकाळापासून खाचखळग्यांनी भरलेल्या या रस्त्याचे मुरुमीकरण केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र मुरमीकरणानंतरही या रस्त्याची पातळी महामार्गापेक्षा खोलगटच असल्याने पावसाळ्यात रस्त्यावरुन वाहणार्या पाण्याचा निचरा कसा होणार असा प्रश्न व्यापार्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

अतिशय प्राचिन मानवी वसाहतींमध्ये गणल्या जाणार्या संगमनेर शहरात 1860 साली नगरपालिकेची स्थापना झाली. येथील व्यापार्यांनी पुढाकार घेत तत्कालीन ब्रिटीश सरकारला पालिका कौंसिलची मंजुरी देण्यास भाग पाडले होते हे विशेष. त्यावेळी पालिकेचा कारभार करणार्या मंडळींनी दूरदृष्टीने आजच्या गावठाणात असलेल्या शहराचा विकास केला. त्यातूनच संपूर्ण भूमीगत गटार व्यवस्था असलेले शहर म्हणून संगमनेरची जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली. शहरातून जाणार्या कोल्हार-घोटी राज्य मार्गाच्या खालून पूर्व-पश्चिम मुख्य गटार गेली आहे. तत्कालीन निर्मात्यांनी या गटाराची रचना अशी केली होती की 20-20 वर्ष ती कधी उघडावी लागत नाही. गावठातील अन्य गटारांची स्थितीही अशीच आहे. यावरुन पालिकेकडून प्रत्येक काम किती बारकाईने अभ्यास करुन होत असे हे दिसून येते.

मात्र अलिकडच्या काळात ‘गटार’ म्हणजे पैसा वाहण्याचे साधन झाले आहे. वर्षभर शहराच्या कोणत्या ना कोणत्या भागात गटाराचे काम सुरुच असते. मात्र वारंवार गटारांची कामं होवूनही समस्यांचे निराकरण होत नाही, किंबहुणा ते जाणीवपूर्वक केले जात नाही. अशीच स्थिती सध्या छत्रपती स्मारक ते कटारिया कॉर्नर या रस्त्यावर अनुभवायला येत आहे. या रस्त्यावर सुरुवातीलाच असलेल्या छत्रपतींच्या प्रतिमेजवळ दरवर्षी पावसाळ्यात एखाद्या रिमझीमनेही मोठे तळे साचते. याच ठिकाणी मारुतीरायाचे मंदिर असल्याने दर्शनासाठी सकाळपासून भाविकाची मोठी वर्दळ असते. शिवाय बहुतेक उपनगरांना जोडणार्या रस्त्याच्या मुखालाच ही स्थिती असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध व अन्य पादचारी आणि दुचाकीस्वारांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशोक चौकातील महादेव मंदिराजवळही अशीच स्थिती गेली वर्षोनुवर्ष बघायला मिळते. मात्र पालिका त्याबाबत कधीही गंभीर असल्याचे दिसून आले नाही.

त्यामुळे मागील सगळा अनुभव विचारात घेवून यावेळी मात्र या रस्त्यावरील व्यापारी सजग झाले असून जो पर्यंत पाण्याच्या निचर्याची समस्या दूर होत नाही तो पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याबाबत शुक्रवारी (ता.21) सुरु होणारे डांबरीकरणाचे काम थांबवल्यानंतर या व्यापार्यांनी एकत्रितपणे पालिकेला निवेदनही दिले असून त्यातून या रस्त्याच्या समस्या दूर करुनच काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. त्यातून प्रशासक तथा मुख्याधिकारी कसा मार्ग काढतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने 1980 साली तत्कालीन नगराध्यक्ष शेख नूरमोहंमद शरफूद्दीन (पहेलवान) यांच्या पुढाकारातून सद्यस्थितीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा असलेले स्मारक उभारले गेले होते. गेल्या 55 वर्षात या स्मारकाशिवाय छत्रपतींचे शहरात अन्य कोठेही स्मारक नसल्याने या जागेला शिवप्रेमींच्या मनात वेगळे स्थान आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात मात्र या स्मारकाच्या एकाबाजूला सतत पाण्याचे तळे साचत असल्याने किमान छत्रपतींचे स्मारक तरी त्यातून मुक्त करा अशी शिवप्रेमींचीही जूनी मागणी आहे. त्याला आता स्थानिक व्यापार्यांचाही प्रतिसाद मिळाल्याने यंदाच्या पावसाळ्यात छत्रपतींच्या या एकमेव स्मारकासह अशोकचौकातील काशीविश्वेश्वर मंदिराचा परिसर तळे मुक्त होईल का याची उत्सुकता आहे.

