नायक वृत्तसेवा, संगमनेर
जूनच्या पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणे सवलती न मिळाल्याने जिल्ह्यातील व्यापारी वर्गात काहीशी नाराजी असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशान्वये भुसार मालाच्या ठोक व्यापाऱ्यांसह कृषी उत्पादनांच्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारे कांद्याचे लिलाव 31 मे पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. मात्र यापुढे सोमवार ते शनिवार या कालावधीत सवलतीच्या वेळेत ते घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासोबतच जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या किराणा व भुसार मालाच्या दुकानांना मालाचा पुरवठा व्हावा यासाठी ठोक विक्रेत्यांनाही दिलेल्या वेळेत आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गातील काहींना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज सायंकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत कोविड प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विविध विभागांकडून आलेल्या पूरक विषयांवर चर्चा झाली. जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सीजन खाटांवर जवळपास 50 टक्के रुग्ण असल्याने जिल्ह्याला अनलॉकच्या सवलतींचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे पुढील कालावधीसाठी नवीन नियमावली जाहीर न करता यापूर्वीचा आदेशच कायम ठेवण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारे व्यवहार आणि जीवनावश्यक श्रेणीतील किराणा मालाच्या दुकानांना मालाचा पुरवठा करता यावा यासाठी किराणा व भुसार मालाच्या ठोक दुकानांना सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली.

यातून उद्यापासून जिल्ह्यातील सर्व किराणा व भुसार मालाच्या ठोक विक्रेत्यांना सकाळी 7 ते 11 या कालावधीत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच 31 मे पर्यंत बंद असलेला संगमनेरचा कांदा बाजारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातच सुरू ठेवण्यास कोविड नियमांचे पालन करून परवानगी देण्यात आली आहे. बाजार समितीच्या मुख्य आवारात केवळ कांद्याचे लिलाव व भुसार मालाच्या व्यापाराला सोमवार ते शनिवार या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

संगमनेरच्या बाजार समितीच्या मागणीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी भाजीपाला व फळांच्या व्यवहारासाठी वडगाव पान उपबाजार समितीत ठोक बाजार भरण्यास परवानगी दिली होती. तोच आदेश यापुढेही कायम ठेवण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील भाजीपाला व फळांचा ठोक बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात भरणार नाही. वडगाव पान येथील उपबाजार समितीत सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या कालावधीत हा बाजार सुरू राहील. शनिवारी सकाळी 11 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत येथे कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

अहमदनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात फक्त भुसार मालाच्या व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. फळे, भाजीपाला व अन्य शेतीमाल नेप्ती येथील उपबाजार समितीच्या आवारातच न्यावा लागेल. वरील बाजार समित्यांंशिवाय जिल्ह्यातील अन्य सर्व ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्या व उपबाजार समित्यांमधील व्यवहार यापूर्वीच्या नियमाप्रमाणे सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहतील. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा उपसमित्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार होणार नाहीत असे या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.

संगमनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि टोमॅटो या शेती उत्पादनांची खूप मोठ्या प्रमाणात आवक-जावक होत असते. जिल्ह्यातील कांदा आणि टोमॅटोचे आगार म्हणूनही संगमनेरची ओळख आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे व्यवहार ठप्प असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गही आर्थिक अडचणीत आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी भाजीपाला व फळांसह कांद्याचे लिलाव घेण्यासही परवानगी दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह कृषी उत्पादनांच्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Visits: 244 Today: 4 Total: 1101794
Post Views:
3,936