‘लॅक्टॅलीस-सनफ्रेश’कडून दूधदरात प्रतीलिटर एक रुपया वाढ विविध जिल्ह्यांतील हजारो दूध उत्पादकांना होणार फायदा
नायक वृत्तसेवा, नगर
डेअरी क्षेत्रात जगातील अग्रगण्य लॅक्टॅलीस महाराष्ट्रात सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज (प्रभात ब्रँडची मालकी असलेला) या नावाने कार्यरत असून, त्यांनी शेतकर्यांकडून खरेदी करण्यात येणार्या दुधाच्या किंमतीमध्ये प्रतीलिटर किमान एक रुपया वाढ करण्यात असल्याचे जाहीर केले आहे. या वाढीव दर देण्याच्या निर्णयानुसार, लॅक्टॅलीस आता 3.5/8.5 एसएनएफ (सॉलिड नॉन फॅट) गुणवत्तेच्या दूधासाठी प्रतीलिटर 30 रुपयांपेक्षा जास्त दर दूध उत्पादक शेतकर्यांना देणार आहे. ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
बहुतांश महत्त्वाच्या उत्पादक सहकारी संघटनांसहित अन्य डेअरींची महाराष्ट्रातील सरासरी खरेदी किंमत ही प्रतीलिटर 30 रुपयांपेक्षा कमी आहे. या निर्णयामुळे लॅक्टॅलीस ही राज्यातील खरेदी किंमतीमधील अग्रणी कंपनी बनली आहे. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, पुणे आणि नाशिक या भागांत दूध पुरवठा करणार्या 50 हजारांहून जास्त दूध उत्पादक शेतकर्यांना याचा लाभ मिळणार आहे. कोविड महासाथीच्या उद्रेकानंतर दूध खरेदी किंमतीत झालेल्या घसरणीमुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकर्याला या दरवाढीमुळे दिलासा मिळाला आहे. एकूणच, गेल्या काही काळापासून दूध उत्पादक शेतकर्यांची दूध खरेदी किंमतीमध्ये दरवाढ व्हावी, अशी अपेक्षा होती.
येत्या उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची देखभाल करण्यासाठी आणि आपत्कालीन संकटांचा सामना करण्यासाठी कंपनीशी संलग्न असलेल्या दूध उत्पादक शेतकर्यांना या दरवाढीमुळे मोठी मदत मिळणार आहे. कोविडच्या संकटानंतर व्यवसाय पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे. टाळेबंदीच्या काळात शेतकर्यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला असल्याने त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे, अशी कंपनीची भावना आहे. याबाबत आपले मत व्यक्त करताना सनफ्रेश अॅग्रो- लॅक्टॅलीस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मित्रा म्हणाले, लॅक्टॅलीसमध्ये सर्वत्र आणि सनफ्रेशमध्येही दूध उत्पादक शेतकरी हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. दुर्दैवाने गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या टाळेबंदीमुळे दूधाच्या आणि दुग्ध उत्पादनांच्या मागणीत झालेल्या घसरणीचा फटका शेतकर्यांना सहन करावा लागला. कोविडचा प्रभाव कमी झाला असून बाजार पुन्हा खुले झाले असल्याने आता सर्वात आधी आम्हांला शेतकर्यांपर्यंत लाभ पोहोचवायचा आहे. यामुळे आम्ही हा निर्णय घेतला असून बाजारातून याला सकरात्मक प्रतिसाद मिळेल आणि इतर कंपन्या देखील आमच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या शेतकर्यांना वाजवी किंमत देऊ करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
‘लॅक्टॅलीस-सनफ्रेश’ ही या क्षेत्रातील एक अग्रणी डेअरी कंपनी आहे. पारदर्शक दूध खरेदी पद्धत आणि गुणवत्ता, वेळेत पैसे देणे, पशुखाद्य आणि खनिज मिश्रणावर अनुदान, पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षण, बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी मदत, दिवाळी बोनस आणि इतर असे इतर अनेक लाभ देऊ करणारी कंपनी अशी तिची ओळख आहे.