‘थोरात’ कडुन दोनशे रुपये शेतकऱ्यांना तर वीस टक्के बोनस व तीस दिवसांचे सानुग्रह अनुदान कामगारांना

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर यशस्वी वाटचाल करतांना थोरात सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. उच्चांकी भाव देतांना कायम शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जोपासले असून दिवाळीनिमित्त यावर्षी ऊस उत्पादकांना मागील हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना दोनशे रुपये प्रति टन व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना १०० रुपये प्रति टन देण्यात येणार असून दरवर्षीप्रमाणे कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा  चेअरमन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभामध्ये त्यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर माजी आ. डॉ.सुधीर तांबे, ॲड. माधव कानवडे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, बाबा ओहोळ, व्हा. चेअरमन पांडुरंग  घुले, लक्ष्मण कुटे,संपत डोंगरे, शंकर खेमनर, संचालक संतोष हासे, संपत गोडगे, इंद्रजीत थोरात, इंद्रजीत खेमनर, डॉ.तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विजय राहणे,गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजणे, दिलीप नागरे,लता गायकर, सुंदर डुबे,बंडू न भाबड, मदन आंबरे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कारखान्याने कायम सभासद शेतकरी व कामगारांचे हित जोपासत गौरवास्पद वाटचाल केली आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त सन २०२४ – २५ या गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसास कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना २०० रुपये प्रति टन व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांना १०० रुपये प्रति टन अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना ३२०० प्रति टन भाव मिळणार आहे.
यामुळे सभासद शेतकरी व ऊस उत्पादकांची दिवाळी गोड होणार असून दरवर्षीप्रमाणे कारखान्याकडून कामगारांसाठी २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये  आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व ऊस उत्पादकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
दरवर्षी सभासदांना दीपावलीनिमित कारखान्याकडून १५ किलो मोफत साखर दिली जाते. यावर्षी प्रत्येक शेअर्ससाठी ३० किलो मोफत साखर देण्यात येणार असल्याचे  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले आहे. साखर घेण्यासाठी येताना सभासदांनी आपले डिजिटल कार्ड घेऊन यावे अथवा सोसायटीचे हमीपत्र व अधिकार पत्र घेऊन यावे असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

Visits: 23 Today: 2 Total: 1106621

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *