गावच्या विकासासाठी मतभेद विसरून एकत्र या! ः थोरात ‘यशोधन’ संपर्क कार्यालयात नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या अनिवार्य असून निवडणूक झाली की सर्व मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येणे ही तालुक्याची संस्कृती राहिली आहे. नवीन पदाधिकार्यांनी पक्षभेद-मतभेद न करता सर्वांना बरोबर घेत गावाचा विकास साधावा असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
‘यशोधन’ संपर्क कार्यालयात संगमनेर तालुक्यातील नवीन सरपंच, उपसरपंच व पदाधिकार्यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, इंद्रजीत थोरात, आर.एम.कातोरे, अजय फटांगरे, चंद्रकांत कडलग, सोमनाथ गुंजाळ, मधुकर गुंजाळ, अर्चना बालोडे, विष्णूपंत रहाटळ, राजेंद्र चकोर, गौरव डोंगरे, विलास नवले, मोहन गुंजाळ आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. या तालुक्याने राजकारणाची आदर्श संस्कृती निर्माण केली आहे. संगमनेरची ही वैभवशाली परंपरा इतरांनाही दिशादर्शक ठरली आहे. भारतामध्ये लोकशाहीप्रणाली असून लोकशाहीमध्ये निवडणुका अनिवार्य आहेत. ग्रामपंचायती, विधानसभा व लोकसभा यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका सातत्याने होत असतात. परंतु निवडणुकांमध्ये मनभेद कधीही होऊ देऊ नका. संगमनेर तालुक्याने तर आपण वेगळी संस्कृती निर्माण केली आहे. निवडणुका झाल्या की सर्व मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येत असतो. हीच परंपरा सर्वांनी जोपासायची आहे. गावचे नेतृत्व करताना सर्वांना सोबत घ्या. शासकीय योजना प्रभावीपणे राबवताना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम करा. शासकीय योजनांच्या पाठपुराव्यासाठी आपण कायम प्रत्येकाच्या पाठिशी उभे आहोत. संगमनेर तालुका विकासातून पुढे जात असून सहकार, शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे तालुका हे विकासाचे मॉडेल ठरला आहे. त्याचे अनुकरण अनेक ठिकाणी होत आहे. आता यामध्ये अधिकाधिक काम करताना विकासातून वैभवाकडे जाताना प्रत्येक गाव हे आदर्श होईल यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी विविध मान्यवरांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.