वांबोरी ग्रामपंचायतकडून गाळेधारकांना दिलासा
वांबोरी ग्रामपंचायतकडून गाळेधारकांना दिलासा
नायक वृत्तसेवा, राहुरी
वांबोरी ग्रामपंचायतीने कोरोना संकटात ग्रामपंचायत मालकीच्या दुकान गाळ्यांना चार महिन्यांचे मासिक भाडेमाफीचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

ज्येष्ठ नेते अॅड.सुभाष पाटील व तनपुरे कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या सूचनेवरून ग्रामपंचायतीने बाजारपेठेतील 107 गाळेधारक व 45 टपरी धारकांना चार महिन्यांचे साडेचार लाख रुपये भाडे पूर्ण माफ केले. त्यामुळे, व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वांबोरीची बाजारपेठ ब्रिटीश काळापासून नावलौकिक प्राप्त आहे. बाजारपेठेत मोठी उलाढाल असते. परंतु, कोरोना संकटात दुकाने बंद राहिल्याने आर्थिक मंदीची लाट पसरली. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला. सरपंच रोहिणी कुसमुडे व ग्रामविकास अधिकारी गागरे यांनी चार महिन्यांचे गाळेभाडे माफीच्या निर्णयावर तातडीने अंमलबजावणी केली. तसेच वांबोरी ग्रामपंचायतीने लॉकडाऊन काळात सहावेळा निर्जंतुकीकरणाची फवारणी केली. गावात येणार्या पाहुण्यांना विलगीकरण कक्षात ठेवून, कोरोना संसर्ग रोखला. उदयसिंह पाटील मित्रमंडळातर्फे ग्रामस्थांना मोफत भाजीपाला, सॅनिटायझर, मास्क वाटप करण्यात आले. अन्नछत्र सुरू करून, हातावर काम करणार्या गरजू कुटुंबांना आधारही दिला. आता, ग्रामपंचायतीतर्फे व्यापार्यांना दिलासा मिळाला आहे.

