बोटा येथील बँक अधिकार्यांचा प्रामाणिकपणा.. जादा आलेली रक्कम शेतकर्याला केली परत…
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर येथील शेतकर्याकडून जादा आलेली रक्कम बोटा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकार्याने दोन दिवसांनी शेतकर्याला परत केल्याने अधिकार्याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अकलापूर येथील शेतकरी संजय साळवे यांनी काबाडकष्ट करुन जमा केलेली पुंजी बचत व्हावी म्हणून बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (ता.6) बोटा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेत 45 हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडून रोखपालला 50 हजार रुपये गेले. शेतीच्या कामाची ओढ असल्याने घाईगडबडीत शेतकरी साळवे यांच्याकडून पाच हजार जादा गेले. परंतु, रविवारी बँकेला सुट्टी असल्याने ते सोमवारी बँकेत गेले. त्यावेळी बँक अधिकार्यांनी जादा आलेली पाच हजार रुपयांची रक्कम शेतकरी साळवे यांना परत केली. याप्रसंगी व्यवस्थापक सागर रोकडे, सहाय्यक व्यवस्थापक रमणरंजन साहू, रोखपाल अरुण जोगळेकर, लिपीक आदित्य काळे यांचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. बँक अधिकारी व कर्मचार्यांच्या प्रामाणिकपणाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.