घरकुले मंजूर करण्यात नेवासा जिल्ह्यात अव्वलस्थानी ः कांगुणे गेल्या चार वर्षांत तालुक्यात 8 हजार 740 घरकुलांना मंजुरी

नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या चार वर्षांत विविध योजनांतील घरकुले मंजूर करण्यात नेवासा तालुका अहमदनगर जिल्ह्यात अव्वलस्थानी असून आत्तापर्यंत नेवासा तालुक्यासाठी 8 हजार 740 इतकी घरकुले मंजूर झाली आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 4 हजार 157 घरकुले पूर्ण झाली असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना सभापती कांगुणे म्हणाले, नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनीता गडाख यांच्या नेतृत्वाखाली घरकुलांबाबत नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सन 2016-17 या वर्षात 963 घरकुले मंजूर झाली. त्यामध्ये 801 घरकुले पूर्ण झाली. सन 2017-18 या वर्षात 1 हजार 086 घरकुले मंजूर झाली; त्यामध्ये 926 घरकुले पूर्ण झाली. सन 2018-19 मध्ये 390 मंजूर घरकुलांपैकी 253 घरकुले पूर्ण झाली. सन 2019-20 मध्ये 1 हजार 727 घरकुले मंजूर झाले. त्यामध्ये 658 घरकुले पूर्ण झाले. चालू वर्षात सन 2020-21 मध्ये 1 हजार 950 घरकुले मंजूर झाली, त्यात 5 पूर्ण झाली असून प्रधानमंत्री आवास योजनेत आत्तापर्यंत 2 हजार 664 घरकुले पूर्ण झाली असल्याचे सभापती कांगुणे यांनी सांगितले.

रमाई आवास घरकुल योजनेच्या संदर्भात माहिती देताना सभापती कांगुणे म्हणाले, या योजनेत सन 2016-17, 2017-18, 2018-19, 2019-20 या वर्षात 1 हजार 402 घरकुले मंजूर करण्यात आली. वरील चार वर्षात शबरी घरकुल योजनेत 172 घरकुलांना मंजुरी मिळाली; त्यामध्ये 91 घरकुले बांधून पूर्ण झाली आहे. पंचायत समितीमार्फत आत्तापर्यंत चार वर्षांच्या कालावधीत प्रधानमंत्री, रमाई, शबरी या विविध घरकुल योजनेच्या अंतर्गत 8 हजार 740 घरकुलांना मंजुरी मिळाली. त्यात 4 हजार 157 घरकुले तालुक्यात बांधून पूर्ण झाली असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी शेखर शेलार, उपसभापती किशोर जोजार, पंचायत समितीचे सर्व सदस्य, सर्व घरकुल कक्ष विस्तार अधिकारी, सर्व सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सर्व ग्रामीण निर्माण अभियंता यांनी विशेष योगदान दिले असल्याचे सभापती कांगुणे यांनी सांगितले. तालुक्यात मंजूर 8 हजार 740 घरकुलांपैकी 4 हजार 157 घरकुले अपूर्ण अवस्थेत असून ती लाभार्थ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नेवासा तालुक्यात एकूण 8 हजार 740 घरकुलांना मंजुरी मिळाल्याने एक लाख वीस हजार रुपये एका लाभार्थ्याला मिळाले. हेच पैसे तालुक्यातील बाजारपेठेत फिरल्याने एखाद्या छोट्या कारागिराला ते कामाच्या माध्यमातून मिळाले. या अर्थकारणात तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्री शंकरराव गडाख व पंचायत समितीचे नेतृत्व करणार्या सुनीता गडाख यांची मिळालेली साथ यामुळे तालुक्यातील गोरगोरगरीब लाभार्थ्यांची प्रगती साधली गेली आहे.
