श्रीरामपूरमध्ये 28 गोवंश वासरांची कत्तलीपासून सुटका शहर पोलिसांची कारवाई; कडक पावले उचलण्याची गोप्रेमींची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी मुक्या गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचे समोर येत आहे. शिवाय वारंवार कारवाया होऊन देखील गोवंशांची हत्या काही बंद होण्याचे नाव घेईना. बुधवारी (ता.5) देखील श्रीरामपूर शहर पोलिसांनी कत्तलीच्या उद्देशाने जमा करुन ठेवलेल्या 28 गोवंश वासरांची सुटका केली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, शहरात कत्तलीच्या उद्देशाने वासरे गोळा करुन ठेवल्याची माहिती खबर्याकडून पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन छापा मारत 14 हजार रुपये किंमतीच्या 28 मुक्या जीवांची कत्तलीपासून मुक्तता केली. त्यानंतर ही वासरे संगमनेर येथील जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या गोशाळेत रवाना करण्यात आली.

या प्रकरणी शहर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9 सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (च), 11 (ज) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावरुन अद्यापही शहरात गोवंशांची कत्तल होत असल्याचे अधोरेखित होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गोवंश हत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करुन मुक्या प्राण्यांचे जीव वाचवावे अशी मागणी गोप्रेमी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, गोशाळेत रवाना करण्यात आलेल्या 28 वासरांपैकी 13 वासरे मयत पावलेली असल्याचे समजते.
