समाज माध्यमाचा मित्रांनी सत्कार्यासाठी केला सदुउपयोग! व्हेंटिलेटरवर असणार्‍या मित्राला वैष्णवी चौक मित्रमंडळाकडून आर्थिक मदत

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी फॅक्टरी येथील एक तरुण अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात फुफ्फुसाच्या आजाराने व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी संघर्ष करतोय. आत्तापर्यंत साडेतीन लाख रुपये खर्च झाला. त्यांच्या घरातील परिस्थितीही बेताची. दरम्यान, या संकटाची मित्रांना माहिती समजली अन् संकटात मित्र धावून आले. समाज माध्यमावरुन आवाहन करत अवघ्या चार दिवसांत दीड लाखांची मदत जमविली. आणि समाज माध्यमाचा वापर सत्कर्मासाठी करून मित्रांनी सामाजिक भान जपल्याचे अधोरेखित केले.

संदेश सुहास पाटोळे (वय 21, रा.राहुरी फॅक्टरी) असे आजारी असलेल्या तरुणाचे नाव आहे. स्थापत्य अभियंता पदविका पूर्ण करून राहुरी फॅक्टरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी तो कार्यरत आहे. वडील तनपुरे कारखान्याच्या सेवेत असले तरी, तीन महिन्यातून एखादा पगार होत असल्याने घरची परिस्थिती बेताचीच. त्यामुळे वडील भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा गरीब परिस्थितीत संदेश याने कोरोना काळात गरजूंची मदत केली. नगर-मनमाड रस्त्यावरील खड्ड्यांविरुद्ध आंदोलनात, रुग्णांना रक्ताची गरज पडली तर कायम अग्रभागी राहिला. आता त्याच्यावर नियतीची वक्रदृष्टी पडली.

संदेशच्या फुफ्फुसात रक्तवाहिनी ढकलली गेली. रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला. श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. या आजाराने संदेशला अक्षरशः ग्रासले. त्याला 15 डिसेंबर रोजी अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अतिदक्षता विभागात पंधरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. साडेतीन लाख रुपये खर्च झाला. संदेशच्या मित्रांना ही माहिती समजली. वैष्णवी चौक मित्रमंडळातर्फे ‘प्लीज हेल्प संदेश’ नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला. तसेच फेसबुकवर मदतीच्या पोस्ट व्हायरल झाल्या. अवघ्या चार दिवसांत एक लाख साठ हजार रुपये जमा झाले. यातून संदेशच्या कुटुंबाला आधार मिळाला. यावरुन समाज माध्यमाचा सामाजिक भान जपून सत्कर्म साधता येत असल्याचे मित्रांनी अधोरेखित केले असल्याचे स्पष्ट होते.

संदेश पाटोळे या तरुणाने सेवाभावी कार्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गरीब कुटुंबातील या तरुणावर संकट ओढवल्याने त्याच्या पाठिशी उभे राहण्याचे ठरविले. समाज माध्यमाद्वारे आवाहन केल्यावर कुवतीनुसार शंभर ते तीन हजार रुपयांपर्यंत मदत संदेशच्या बंधूच्या बँक खाती जमा झाली. चार दिवसांत तब्बल 1 लाख 60 हजार रुपये जमले. आता संदेशची प्रकृती स्थिर आहे.
– वसंत कदम (अध्यक्ष, वैष्णवी चौक मित्रमंडळ-राहुरी फॅक्टरी)

Visits: 13 Today: 1 Total: 118710

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *