पालिकेच्या नूतन उपनगराध्यक्षांनी तुडविले नामदार थोरातांचे संकेत! पदभार स्विकारताच बसस्थानकावर झाला पुन्हा ‘फ्लेक्स’ संस्कृतीचा जन्म..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर बसस्थानकाच्या आवारात आपल्याच कार्यकर्त्यांनी उभारलेले आपलेच ‘फ्लेक्स’ काढून ‘आदर्श’ निर्माण करणार्या महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे संकेत त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकार्याने पायदळी तुडविले आहेत. हा प्रकार पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून बसस्थानकाच्या परिसरातील ‘त्या’ फ्लेक्सवर संगमनेर नगर पालिका काय कारवाई करणार असा सवाल विचारला जात आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नामदार थोरात यांनी स्वतः उपस्थित राहून निर्माण केलेल्या ‘फ्लेक्स मुक्त’ बसस्थानकाच्या संकल्पनेला यामुळे तडा गेला असून हा धक्का देण्याचे कामही त्यांच्याच निष्ठावान पदाधिकार्याने केले आहे. या कृत्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून ‘फ्लेक्स फ्री’ असलेल्या बसस्थानक परिसराच्या विद्रुपीकरणाचाही शुभारंभ झाल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे सदर ठिकाणी फ्लेक्स लावण्यासाठी पालिकेची पूर्व परवानगी आवश्यक आहे, मात्र सदरचा फ्लेक्स लावतांना पालिकेच्या उपनगराध्यक्षांना त्याचा विसर पडल्याचेही समोर आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका म्हणजे जिल्हा मुख्यालयानंतर सर्वाधीक प्रगत आणि पुढारलेला तालुका समजला जातो. सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या पदचिन्हांवर पाऊल ठेवीत गेल्या चार दशकांपासून संगमनेरचे नेतृत्त्व करणार्या नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुसंस्कृत राजकारणाची बीजे रोवली. सलग तिनवेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर सन 1999 साली त्यांची राज्याच्या मंत्रीमंडळात पहिल्यांदा नियुक्ति झाली आणि तेव्हापासून संगमनेर तालुक्याचे रुपडे बदलण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन दशकांच्या कालावधीत नामदार थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावण्याच्या विविध योजनांसह शहराच्या वैभवात भर घालणार्या विविध देखण्या वास्तुही उभारल्या. त्यापैकीच एक संगमनेर बसस्थानकाची सुसज्ज आणि विस्तीर्ण अशी इमारत आहे.
गेल्या काही काळापासून या देखण्या इमारतीच्या बाह्यबाजूला ‘फ्लेक्स संस्कृती’ उदयाला आली, आणि बघता बघता त्याची संख्या इतकी वाढली की त्यात शहराच्या वैभवात भर घालणार्या या वास्तुचेच विद्रुपीकरण सुरु झाले. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात दररोज एकमेकांचे फ्लेक्स लावण्याची आणि फ्लेक्सवरच आपण किती मोठे आहोत हे दाखवण्याची एकप्रकारची स्पर्धात येथे बघायला मिळत होती. यासर्व गोष्टींमुळे बसस्थानकाच्या व्यापारी संकुलात लाखों रुपये मोजून गाळे घेणार्यांची दुकानेही झाकली जावू लागल्याने त्यांच्याकडूनही नाराजीचा सुर निघतच होता. मात्र फ्लेक्स लावणारे नामदार बाळासाहेब थोरात यांचेच कार्यकर्ते असल्याने ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करण्याची वेळ या परिसरातील व्यापार्यांवर आली होती.
बसस्थानकावरील वाढत्या विद्रुपीकरणाची कुणकूण कानावर आल्यावर नामदार बाळासाहेब थोरातांनी याबाबतची माहिती घेतली. मात्र केवळ यंत्रणेला सांगून ही पद्धत बंद होणार नाही, तर त्यासाठी वेगळी शक्कल लढवावी लागेल या विचाराने त्यांनी योग्य वेळेची प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी 1 जानेवारी रोजी बसस्थानकाचा परिसर तर नववर्षांच्या शुभेच्छा देणार्या कथीत नेत्यांच्या भल्या मोठमोठ्या फ्लेक्सने अक्षरशः गजबजून गेल्याचे चित्र संगमनेरकरांनी पाहीले. नामदार बाळासाहेब थोरातही याच प्रसंगाची वाट बघत होते. चालू वर्षी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी तडक संगमनेरचे बसस्थानक गाठले. या परिसरातील एकामागून एक लावलेले गगनचुंबी फ्लेक्स पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले.
त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्यासह बसस्थानकावर त्यावेळी उपस्थित असलेल्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमक्ष आपल्याच एका कार्यकर्त्याने लावलेला आपलाच फ्लेक्स सर्वप्रथम काढण्याची सूचना देत बसस्थानकाची स्वच्छता मोहीम सुरु केली. यावेळी प्रशासनाने बसस्थानकाच्या आवारातील सर्वच फ्लेक्स काढून घेतले. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर संगमनेरच्या वैभवात भर घालणार्या या वास्तुचे सौंदर्य पुन्हा संगमनेरकर अनुभवू लागले. तेव्हापासून ते आजवर स्थानिक प्रशासन व बस आगार व्यवस्थापनाने या परिसरात कोणालाही फ्लेक्स लावण्यास परवानगी दिली नाही. मात्र बुधवारी (ता.7) संगमनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शैलेश कलंत्री यांची वर्णी लागली, आणि तब्बल तीन महिन्यांपूर्वी आपलाच फ्लेक्स हटवून आदर्श उभा करणार्या नामदार थोरात यांच्या संकेतांना त्यांच्याच एका पदाधिकार्यांच्या रुपाने पायदळी तुडविले गेले.
संगमनेरात कोठेही फ्लेक्स लावण्यासाठी संगमनेर नगर परिषदेची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय शहरात कोठेही फ्लेक्स लावल्यास पालिकेच्या ‘अतिक्रमण’ विभागाकडून त्यावर तत्काळ कारवाई होते. या प्रकरणात मात्र ना पालिकेकडे कोणतीही परवानगी मागण्यात आली, ना त्यापोटी कोणताही महसुल जमा करण्यात आला. त्यामुळे पालिकेचा पदाधिकारी झाला की काहीही करता येतं असा संदेशच उपनगराध्यक्षांनी पदभार स्विकारताच दिल्याची चर्चा यध्या सुरु आहे. चक्क संगमनेरच्या नेतृत्वाचे संकेत पायदळी तुडविण्याची ही कृती पालिका आणि खुद्द नामदार बाळासाहेब थोरात किती गांभिर्याने घेतात हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.