श्रीरामपूरमध्ये गावठी हातभट्टी दारु अड्ड्यांवर छापे 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; तिघांवर गुन्हे दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील कदम वस्ती आणि हरेगाव येथे गावठी हातभट्टी दारुअड्ड्यांवर रविवारी (ता.27) उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने छापेमारी करीत 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे अवैध दारुविक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत श्रीरामपूर शहरातील कदम वस्ती व हरेगाव येथे गावठी हातभट्टी दारुअड्डे सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी आपल्या पथकातील अधिकारी व अंमलदारांना वरील ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने छापा टाकून पुष्पाबाई प्रभाकर काळे हिच्याकडून 45 हजार 500 रुपयांचे कच्चे रसायन आणि 2 हजार रुपयांची तयार गावठी हातभट्टी दारु, अशोक बाबुराव गायकवाड (रा. हरेगाव) याच्याकडून 35 हजार रुपयांचे कच्चे रसायन व 2 हजार रुपयांची तयार गावठी हातभट्टी दारु आणि विलास शिवाजी वाघ (रा. खैरी निमगाव) याच्याकडून 540 रुपयांची देशी दारु व 600 रुपयांची विदेशी दारु असा एकूण 86 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी वरील सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसांत मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, पोहकॉ. सुरेश औटी, पोकॉ. नितीन शिरसाठ आदिंनी केली. या कारवाईचे महिलांनी स्वागत केले आहे तर अवैध दारु विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Visits: 9 Today: 1 Total: 79811

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *