खंडोबा देवाची गणपूजा भक्तीपूर्ण वातावरणात साजरी! चार गोण्या भंडार्‍याची उधळण करीत साजरा झाला पारंपरिक सोहळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जेजूरी येथील खंडोबारायाची गणपूजा करण्याची अत्यंत प्राचीन परंपरा मागील दोन वर्षांपासून संगमनेरातही पाळली जात आहे. त्या अनुषंगाने शनिवारी (ता.10) साळीवाडा येथील खंडोबा देवस्थानात हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. देवाच्या पितळी मूर्तीभोवती भंडार्‍याची उधळण करणार्‍या या उत्सवात यंदा तब्बल चार गोण्या भंडार्‍याचा वापर झाला. गेल्यावर्षी दोन गोण्या संकलित झाल्या होत्या. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव सार्वजनिक पातळीवर साजरा न करता केवळ विश्वस्त मंडळातील काही सदस्यांसह मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

जेजुरी येथील कडेपठार मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून गणपुजेचा उत्सवाचा विधी करण्याची परंपरा आहे. संगमनेर शहरातील साळीवाडा परिसरात श्री मल्हारी मार्तंड खंडोबाराखाचे स्वयंभू स्थान आहे. हजारो संगमनेरकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिरात जेजुरीप्रमाणेच वर्षभरातील सर्व सण व उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने साजरे केले जातात. यावर्षीही 10 जुलै रोजी परंपरेनुसार गणपुजनाचा उत्सव होता. मात्र सध्या कोविड प्रादुर्भावामुळे मंदिरांची कवाडे भाविकांसाठी बंद असल्याने देवस्थान मंडळाने सार्वजनिक स्वरुपात उत्सव साजरा न करता अंतर्गत पद्धतीने केवळ विश्वस्त आणि काही सेवकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला.

यावेळी येळकोटऽ येळकोटऽऽ च्या जयघोषाने परिसरातील वातावरण भक्तीमय बनले होते. भाविकांनी श्रद्धेने पाठविलेल्या भंडार्‍यात मंदिरात विराजमान मल्हारी मार्तंड, म्हाळसादेवी व बानूबाई यांच्या पितळी मूर्ती अक्षरशः सोन्यासमान उजळून दिसत होत्या. पुष्प व विद्युत सजावटीने त्यात आणखी भर घातली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोजक्या उपस्थितीत खंडोबारायांची आरती करुन प्रसादाचेही वाटप करण्यात आले. वाघे शंकरराव रहाणे व त्यांच्या सहकार्‍यांनी देवासमोर जागरण घातले. या कार्यक्रमास विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मदनलाल पारख, कैलास उर्फ आप्पासाहेब केसेकर, पोपटलाल पारख, गोविंद भरीतकर, अण्णा रहाणे, भारत काळे, भाऊसाहेब अभंग, शरदराव गुंजाळ, राजगोपाल पडतानी, पुरुषोत्तम जोशी, संजय करपे आदिंची उपस्थिती होती.

Visits: 10 Today: 1 Total: 82658

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *