धक्कादायक! माजी नगरसेवकाची गाडी अडवून संगमनेरात रस्तालूट!! शहराच्या इतिहासातील पहिलीच घटना; पोलिसांची निष्क्रीयता चव्हाट्यावर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निष्क्रीय असूनही केवळ राजकीय आशीर्वादाने ठाण मांडून बसलेल्या काही पोलीस अधिकार्‍यांमुळे संगमनेरची सामाजिक सुरक्षाच धोक्यात असून आजवर संगमनेरात कधीही न घडलेल्या घटनाही आता घडू लागल्या आहेत. हे स्पष्ट करणारा अतिशय धक्कादायक प्रकार आज पहाटेच्या सुमारास समोर आला आहे. या घटनेत संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगरसेवकाची गाडी भररस्त्यात अडवून चालकाला दमबाजी करीत त्याच्याकडील ऐवज लांबविण्यात आला आहे. संगमनेर शहराच्या गुन्हेगारी इतिहासात आजवर कधीही न घडलेल्या या घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराला ‘साहेब’ नसल्याच्या कारणाने ताटकळावेही लागले. विशेष म्हणजे दिल्ली नाक्यावरील एटीएम फोडी आणि रस्तालुटीचा प्रकार एकाचवेळी घडल्याने संगमनेर शहर पोलिसांची निष्क्रीयता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

याबाबत दैनिक नायकला प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमनेरातील व्यापारी नितीन लाहोटी हे काही कामानिमित्त आपले मित्र व संगमनेर नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर टोकसे यांचे मारुती इर्टिगा (क्र.एम.एच.12/एस.क्यु.6343) हे वाहन घेवून मंगळवारी बाहेरगावी गेले होते. तेथील कामकाज आटोपून लाहोटी व त्यांचे कुटुंबीय बुधवारी (ता.27) रात्री दिड वाजण्याच्या सुमारास माघारी संगमनेरात परतले. रात्रीची वेळ असल्याने लाहोटी यांनी वाहनचालक मनोहर गिते (रा.कोंची) यांना वाहन घेवून घरी जाण्यास व सकाळी पुन्हा येण्यास सांगितले. त्यानुसार वाहनचालक गिते यांनी वाहनातील सामान खाली केले व ते पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास मेनरोडवरुन नगरच्या दिशेने आपल्या ताब्यातील वाहनासह निघाले.

त्यांचे वाहन तीनबत्ती चौकात आले असता पाठीमागून एका पल्सर दुचाकीवरील तिघेजण त्यांच्या मागोमाग येत असल्याचे त्यांनी आपल्या वाहनाच्या आरशात पाहिले. मात्र त्यांच्याकडे लुटण्यासारखे फारकाही नसल्याने व संगमनेरात आजवर वाहने अडवून लुटण्याच्या घटना घडलेल्या नसल्याने त्या भरवशावर ते आपल्या घराच्या दिशेने वाहन चालवित राहिले. त्यांचे वाहन हॉटेल सदगुरुच्या पुढील भागात असलेल्या समनापूर बाह्यवळण चौफुलीवर येताच पाठीमागे असलेली ‘ती’ दुचाकी अचानक त्यांना ओव्हरटेक करुन पुढे आली व त्यांना काही समजण्याच्या आतच दुचाकीस्वाराने त्यांच्या वाहनाला आडवी घालून त्यांना थांबण्यास भाग पाडले.

यावेळी पाठीमागे बसलेल्या दोघांकडे लाकडी दांडके व लोखंडी सळई सारखी हत्यारे असल्याचेही वाहनचालक गिते यांनी आपल्या वाहनाच्या उजेडात पाहिले. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक गिते प्रचंड घाबरले, त्यातच सदर दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या दोघांनी आपल्या हातातील हत्यारे घेवून त्यांच्या वाहनाजवळ धाव घेत एकाने हातातील लोखंडी सळईसारखे हत्यार त्यांच्या मानेला लावले तर दुसर्‍याने दोनच दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेला नवा मोबाईल, त्यांच्या हातातील सुमारे सात ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी व खिशातील आठशे रुपये काढून घेतले. यावेळी त्या दोघांतील एकाने वाहनचालकाला लाकडी दांड्याने मारहाणही केली, तर दुसर्‍याने लोखंडी हत्याराने गाडीचा टायर पंक्चर केला व तिघेही तेथून सुसाट वेगाने लंपास झाले.

या घटनेनंतर घाबरलेल्या गिते यांनी पंक्चर झालेले टायर बदलून पुन्हा संगमनेर गाठले व घडला प्रकार आपल्या मालकाला सांगितला. रात्रीची वेळ असल्याने त्यांनी सकाळी पोलिसांत जावून तक्रार करु हवे तर येथेच मुक्कामी थांबण्यास सांगितले. मात्र गिते यांनी घरी जाण्याचा मनोदय व्यक्त करीत मनात भीती घेवून ते पुन्हा आपल्या गावी कोंचीकडे रवाना झाले. आज (ता.28) सकाळी ते आपले मालक नितीन लाहोटी व वाहनाचे मालक, माजी नगरसेवक किशोर टोकसे यांच्यासह तक्रार अर्ज घेवून शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. मात्र ‘साहेब’ नसल्याने त्यांना बराचवेळ तेथे ताटकळावे लागले, त्यानंतर साहेबांचे आगमन न झाल्याने त्यांनी सोबत आणलेला तक्रार अर्ज स्वीकारुन त्याची पोहोच देण्याची विनंती ठाण्यातील अंमलदारांना केली. मात्र कोणाचेही अर्ज मला विचारल्याशिवाय स्वीकारु नयेत असा ‘साहेबां’चा दंडक असल्याने कोणताही अंमलदार त्यावर दाखल तारीख टाकून देण्यास तयार झाला नाही. त्यामुळे केवळ अर्ज सुपूर्द करुन त्या सर्वांना माघारी फिरावे लागले. आजवर कधीही न घडलेल्या घटनेने संगमनेरात खळबळ उडाली असून पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाकच संपुष्टात आल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

सदरची घटना घडली त्याचवेळी तीनबत्ती चौकातील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार सुरू होता. सदरच्या वाहनाचा पाठलागही तीनबत्ती चौकातूनच सुरू झाला. त्यामुळे या दोन्ही घटनांचे परस्परांशी काही संबंध आहेत का? हे पडताळणेही महत्त्वाचे ठरणार असले तरी गेल्या काही वर्षातील पोलिसांची निष्क्रीयता लक्षात घेता त्यातून काहीही साध्य होणार नाही हे उघड आहे. संगमनेर शहराच्या हद्दीत आजवर कधीही प्रवाशी वाहने अडवून रस्तालुटीचे प्रकार घडलेले नाहीत, मात्र पोलिसांच्या सातत्यपूर्ण निष्क्रीयतेमुळे कोणतीही गुन्हेगारी घटना संगमनेरपासून दूर नसल्याचे आता समोर येवू लागले आहे. यातून गंभीर आरोप होवूनही केवळ राजकीय आशीर्वादाने ठाण मांडून बसलेल्या काही अधिकार्‍यांमुळे संगमनेरची सामाजिक सुरक्षाच आता धोक्यात आल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *