भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रिपदी वैभव पिचड पिचडांना शक्ती देत शरद पवारांना शह देण्याचा भाजपकडून जोरदार प्रयत्न
नायक वृत्तसेवा, अकोले
ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड सध्या ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या पिचडांची भाजपकडूनही नंतर उपेक्षाच झाली. आता मात्र भाजपने पिचडांना शक्ती देण्याचे ठरविले असून माजी आमदार वैभव पिचड यांची भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात ज्येष्ठ नेते पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अहमदनगर जिल्ह्यात कार्यक्रम झाले. त्यावेळी दोघांनीही पिचडांवर टीका केली होती. ऐनवेळी पक्ष सोडल्याचा राग पवारांच्या मनात कायम आहे. विधानसभा निवडणुकीत पिचडांचा पराभव झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमधूनही त्यांना हटवा असे जाहीर आवाहनच पवारांनी अकोले तालुक्यातील लोकांना केले होते. यापुढे पवार आणि राष्ट्रवादीकडून पिचडांना सातत्याने टार्गेट केले जाणार हे दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपने आता पिचडांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले दिसते.
भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये पिचड यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार समीर उराँव यांनी पिचड यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. पिचड यांना राष्ट्रीय राजकारणातील पद मिळावे म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
आदिवासी समाजातील पिचडांचा संपर्क आणि अभ्यास याचा भाजपकडून वापर करून घेतला जाऊ शकतो. नव्या पदाच्या माध्यमातून पिचड आता राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकारला धारेवर धरू शकतात. आदिवासींचे खावटी कर्ज, रोजगार, रेशन, नरेगा मार्फत रोजगार, आदिवासी संघटन, वीज बिल, ऑनलाईन शिक्षण, आदिवासींचा कुपोषण, पोषण आहार, वन जमिनी प्रश्न, शेतीला पाणी, उपसासिंच न योजना, आरक्षण या आदिवासींच्या प्रश्नांवर पिचड पाठपुरावा करीत आहेत. पिचड यांच्या निवडीबद्दल राज्यातील आदिवासी विकास परिषदेने अभिनंदन केले असून राष्ट्रीय पातळीवर त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे परिषदेच्या युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष लकी जाधव यांनी सांगितले. अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात फटाके फोडून पिचडांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले. यासोबतच त्यांना राज्यपातळीवरही महत्वाचे पद देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू असल्याचे सांगण्यात येते. पवारांनी पिचडांना टार्गेट केल्याने भाजपने पिचडांना शक्ती देत पवारांना शह देण्याचा हा प्रयत्न केल्याचे दिसून येते.