रतनगडाला बसविला सातशे किलो वजनाचा महाकाय दरवाजा! सह्याद्री प्रतिष्ठानची कामगिरी; राज्यभरातील दुर्गसेवकांची मदत

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील रतनगड किल्ल्याला सुमारे 700 किलो वजनाचा, दोन फळ्यांचा सागवानी दरवाजा रविवारी (ता.31) अहमदनगरच्या सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे बसविण्यात आला. सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी अतिशय दुर्गम रतनगड किल्ल्यावर नेऊन तेथील त्र्यंबक दरवाजा लावला. तत्पूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचे दगड-माती, पालापाचोळा साफ केला.
साधारण वर्षभरापूर्वी दरवाजाचे मोजमाप घेतले होते. त्यासाठी निधी संकलन केले. कोविडमुळे सर्व काही ठप्प असताना भास्कर गोरे यांनी दरवाजे बनविण्याचे काम सुरू ठेवले होते. सागवानी लाकडात, रायगडाच्या दरवाजाच्या प्रतिकृतीत हा दरवाजा तयार केला. त्यासाठी 2 लाख 60 हजार रुपये खर्च आला.

सह्याद्री दुर्गसंवर्धन विभागाचे राज्य अध्यक्ष गणेश रघुवीर यांच्या मार्गदर्शनाखाली 23 तारखेला हा दरवाजा रतनवाडी येथे नेला. तो पायथ्यापर्यंत नेण्यासाठी राज्यभरातून 300 दुर्गसेवक आले होते. डोक्यावर उचलून पायथ्यापर्यंत नंतर दोन किलोमीटरचा डोंगर पार करीत हा महाकाय दरवाजा तब्बल साडेपाच तासांचा प्रवास करीत रतनगडावर नेला खरा; मात्र तेथे तांत्रिकक अडचण आल्याने सेवकांना तीन रात्री व चार दिवस गडावर थांबावे लागले. 30 तारखेला रात्रभर दुर्ग गोंधळ घालण्यात आला. भंडारा उधळत रात्र जागविली.

सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे याच्या मार्गदर्शनाखाली दुर्गसंवर्धन अध्यक्ष गणेश रघुवीर यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गसेवकांचे सहकार्य लाभले. त्यात शंकर शिंदे, धनंजय काळे, संतोष गजे, भूषण पवार, दिलीप सोनवणे, राज सोनवणे, ऋषीकेश कानकाटे आदी दुर्गसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरवाजा बसविण्यासाठी राज्यभरातील सह्याद्रीचे दुर्गसवक उपस्थित होते. सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणाला भंडारा उधळत दरवाजा बसविण्यात आला. यावेळी दुर्गसेवकांनी मोठा जल्लोष केला. सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून गिरीश मालपाणी पत्नी सोनाली यांच्यासह उपस्थित होते.

असा आहे दरवाजा…
वजन – 700 किलो
उंची – 12 फूट
खर्च – 2 लाख 60 हजार
