श्रीरामपूर तालुका पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात! व्हायरल संभाषण भोवले; शहर पोलीस निरीक्षकांवर मात्र अद्याप कारवाई नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या शनिवारी (ता.29) व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधून पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का लागल्याचा ठपका ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यातूनच रविवारी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. मात्र या संपूर्ण घटनाक्रमात सूत्रधार म्हणून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नाव समोर येवूनही त्यांच्यावर मात्र तत्काळ कारवाई न झाल्याने आश्चर्य निर्माण झाले होते. मात्र आता पोलीस अधीक्षकांनी सोमवारी (ता.31) अखेर त्यांच्यावरही कंट्रोल जमा करण्याची कारवाई केली आहे. सदरची कारवाई केवळ नावानिशी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या आधारावर करण्यात आलेली असून सदर क्लिपच्या सत्यतेबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

गेल्या आठवड्यात शनिवारी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचार्‍यांसह प्रभारी अधिकार्‍यांच्या परस्पर संवादाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमधून सुरुवातीला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व पोलीस शिपाई योगेश राऊत व त्यानंतर कथित वसुली कर्मचारी पो.ना.लक्ष्मण वैरागर व शिपाई राऊत यांच्यातील संभाषणातून तालुका हद्दीतील अवैध व्यावसायिकांकडून गोळा केल्या जाणार्‍या कथीत वसुलीबाबतची चर्चा समोर आली होती. दोन कर्मचार्‍यांच्या व्यक्तिगत वादातून वसुलीचा हा संपूर्ण प्रकार या क्लिद्वारा व्हायरल झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर उपविभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार उपअधीक्षक मिटके यांनी या प्रकरणाच्या दुसर्‍याच दिवशी रविवारी दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांसह पोलीस निरीक्षकांचीही चौकशी करुन त्याबाबतचा गोपनीय अहवाल अधीक्षकांना सोपविला होता. त्यावर तत्काळ कारवाई करीत पोलीस अधीक्षकांनी रविवारीच (ता.30) वैरागर व राऊत या दोघांना निलंबित करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले. मात्र या सगळ्या घटनाक्रमाचे मूळ असलेल्या पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर मात्र लागलीच कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्ह्यातून आश्चर्य व्यक्त होण्यासह उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र अखेर सोमवारी (ता.31) पोलीस अधीक्षकांनी अधिक कठोर भूमिका घेतांना पो.नि.साळवे यांना नियंत्रण कक्षात हजर होण्याचे फर्मान धाडले आहे. या कारवाईने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून पोलीस दलातील वाढत्या भ्रष्टाचाराला त्यातून काही प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली असली तरी कर्मचार्‍यांच्या लाचखोरी नंतरही श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना मात्र ‘अभय’ मिळाल्याचे चित्र आहे. पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारताना जिल्ह्यासाठी लागू केलेल्या नियमांत ज्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाचखोरीत सापडेल, त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना नियंत्रण कक्षात जमा व्हावे लागेल हा महत्त्वाचा नियम होता. त्यानुसार आत्तापर्यंत संगमनेर व अकोले येथील पोलीस निरीक्षकांवर कारवाई झालेली आहे. मात्र श्रीरामपूरच्या लाचखोरीचे प्रकरण समोर येवून चार दिवसांचा कालावधी उलटूनही या नियमानुसार अद्याप तेथील पोलीस निरीक्षकांवर कारवाई झालेली नसल्याने यात राजकीय दबाव तर नाही ना? अशी शंका निर्माण झाली आहे, मात्र त्याचवेळी पोलीस अधीक्षकांकडून कारवाई होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 117580

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *