राज्याच्या भवितव्यासाठी जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था व्हावी ः आ. डॉ. तांबे रोजगार निर्मिती, शिक्षक भरतीबाबत विधान परिषदेत उठविला आवाज
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने अत्यंत चांगले काम केले असून पंचसूत्रीच्या माध्यमातून शिक्षण, उद्योग व आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. राज्याची अर्थव्यवस्था व प्रगती साधायची असेल तर शिक्षण व्यवस्था ही जागतिक दर्जाची होण्यासाठी प्रभावी उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे. याचबरोबर शिक्षक भरतीसह सर्व शाळा अनुदानित कराव्या अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली.
मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत विविध प्रश्नांवर बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, शेती, सहकार व उद्योग ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. यामध्ये अधिकाधिक काम होणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मागील अनेक दिवसांपासून शिक्षकांची भरती झाली नाही. गुणवत्तेचे शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे. याचबरोबर राज्यातील सर्व शाळा शंभर टक्के अनुदानित करा, शाळांना वेतनेतर अनुदानासह संगणकीय लॅब यासाठी अनुदान देणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्था सुधारली, जागतिक दर्जाची झाली तर त्याचा प्रभाव इतर क्षेत्रांवर पडतो आणि त्या माध्यमातून प्रगती साध्य होते. म्हणून राज्याच्या विकासाकरीता शिक्षण हे जागतिक दर्जाचे होणे अत्यंत गरजेचे आहे.
याचबरोबर विविध एमआयडीसींमध्ये काही आजारी उद्योग आहेत. या आजारी उद्योगांकडे हजारो एकर जागा पडून आहे. याबाबत सरकारने प्राधान्याने विचार करून त्याठिकाणी नवीन उद्योग स्थापन करणे किंवा ती जागा इतर उद्योगांना देणे अत्यंत गरजेची आहे. अशी मागणी करताना राज्यभरातील गायरान जमिनी ह्या क्रीडांगणासाठी वापरण्यात याव्या असेही आमदार डॉ. तांबे यांनी म्हटले आहे. सध्या राज्यांमध्ये विना पुराणांचे बेछूट आरोप होत असून त्यामधून वातावरण हे गढूळ होत आहे. जातीय तेढ निर्माण होत आहे हे अत्यंत दुर्दैवी असून सर्वांनी राज्यात चांगले वातावरण राहण्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.