राहुरी तालुक्यातील सडे येथे ‘बर्ड फ्ल्यू’चा शिरकाव! चार हजार गावरान कोंबड्यांची खाद्य व विष्ठेसह शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील श्लोक कुक्कुटपालन शेडमधील मृत कोंबड्या ह्या ‘बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह’ आढळल्या आहेत. तसा अहवाल भोपाळ येथील प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार मंगळवारी (ता.26) रात्री अकरा वाजेपर्यंत पशु संवर्धन विभागाच्या शीघ्र कृती दलाने कुक्कुटपालनमधील चार हजार गावरान कोंबड्यांना मारुन त्यांची खाद्य व विष्ठेसह शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर कुक्कुटपालन शेडचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सडे येथे मागील आठवड्यात श्लोक कुक्कुटपालनामधील चार-पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्यांचे नुमने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. सोमवारी (ता.25) रात्री त्यांचा अहवाल ‘बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह’ आला. दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी पोल्ट्रीमधील सर्व कोंबड्या कलिंग करून विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या शीघ्र कृती दलाच्या पथकाने पीपीई किट घालून पोलीस बंदोबस्तात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चार हजार कोंबड्यांची विल्हेवाट लावली. यावेळी तहसीलदार फसियोद्दीन शेख व महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.

सडे येथे कोंबड्यांची मरतूक आढळल्यानंतर पोल्ट्री फार्मच्या सभोवताली एक किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील शेतकर्‍यांच्या घरगुती कोंबड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार पशु वैद्यकीय अधिकार्‍यांचे चार जणांचे एक पथक असे 32 जणांचे आठ पथकांनी पोलीस बंदोबस्तात घरोघरी जाऊन कोंबड्यांची विल्हेवाट लावली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने पोल्ट्री फार्मपासून दहा किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची वाहतूक, विक्री व खरेदीवर 90 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत राहुरीच्या पशु संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष पालवे म्हणाले, कुक्कुटपालन फार्ममधील कोंबड्या अनैसर्गिक मरतूक होत असल्याचे आढळल्यास पशु संवर्धन विभागाशी संपर्क साधावा. जेणेकरून रोगाचा प्रसार थांबवता येईल. ‘बर्ड फ्ल्यू अजूनही सीमित स्वरूपात आहे. त्यामुळे मनुष्यहानी झाल्याचे आजपर्यंत भारतात आढळलेले नाही. त्यामुळे. सद्यस्थितीत अंडी व चिकन खाण्यासाठी कोणताही धोका नाही.

पोल्ट्री फार्म मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यावरही नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. त्यांचा कोणताही दोष नाही. त्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आहे.
– चंद्रकांत पानसंबळ (सरपंच, सडे)

सडे येथील श्लोक पोल्ट्री फार्ममधील चार हजार गावरान कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावली आहे. त्याचा महसूल खात्याने पंचनामा केला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल.
– फसियोद्दीन शेख (तहसीलदार, राहुरी)

Visits: 104 Today: 1 Total: 1116363

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *