‘बविआ’चे हितेंद्र ठाकूर यांच्या ‘विवा ग्रुप’वर ईडीची कारवाई वसई-विरार व मीरा भाईंदर परिसरातील सहा ठिकाणी टाकले छापे
मुंबई, वृत्तसंस्था
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या ‘विवा ग्रुप’वर सक्तवसुली संचलनालय, अर्थात ईडीने सकाळी कारवाई केली आहे. कथित पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. वसई-विरार आणि मीरा भाईंदर परिसरातील सहा ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत.
प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी हितेंद्र ठाकूर यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. पीएमसी घोटाळ्यात 5 ते 6 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झालं असून त्यातील काही रक्कम विवा संस्थेत गुंतवण्यात आल्याचा संशय ईडीच्या अधिकार्यांना आहे. त्यानुसार ईडीने आज विवा ग्रुपच्या कार्यालयांवर छापे टाकले. वसई-विरारसह मीरा भाईंदर परिसरात ईडीने धाडी टाकल्या असून यात काही महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. विवा ग्रुपशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती अजूनही सुरूच असल्याचं समजतं.
काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात आली होती. ईडीच्या चौकशीनंतर पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज वर्षा राऊत यांनी परत केले होते.
कोण आहेत प्रवीण राऊत?
प्रवीण राऊत हा एचडीआयलची उपकंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत याने 95 कोटींपैकी 1 कोटी 60 लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील 55 लाख पुढे वर्षा राऊत यांना देण्यात आले होते.