श्रीराम मंदिर निर्माणासाठी दहावर्षीय बालिकेचा ‘स्वकमाईतून’ निधी! घराबाहेरच ‘सँडविच’ विक्रीचे दुकान लावून जमा केली शंभर रुपयांची रक्कम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी सुरू असलेल्या निधी संकलन मोहिमेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकीकडे या कार्यात मोठे उद्योजक, व्यापारी व चाकारमानी आपापले योगदान देत आहेत, तर दुसरीकडे तुटपुंजी कमाई असलेले अनेकजण आयुष्याच्या शिदोरीतील काही रक्कम काढून कार्यकर्त्यांच्या हाती सोपवत आहेत. संगमनेरात मात्र यापेक्षाही वेगळ्या पद्धतीची रामभक्ती समोर आली आहे. शहरातील एका दहावर्षीय बालिकेने आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या पैशांऐवजी स्वकामाईतून मिळालेली रक्कम या कार्यास देण्याचा चंग बांधून चक्क सँडविच विक्रीतून शंभर रुपयांचे योगदान मंदिर निर्माणाच्या कार्यास दिले आहेत. त्या चिमुरडीचा हा भाव प्रत्यक्ष रामायणकाळातील रामसेतू निर्माणात आपली भूमिका वठवणार्या खारुताईच्या तोडीचे असल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या संगमनेरात गेल्या 15 जानेवारीपासून श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी निधी संकलन अभियान राबविले जात आहे. विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने घरोघरी जावून प्रत्येक भारतीय नागरिकाचे आर्थिक योगदान संकलित करीत आहे. या कार्यात आत्तापर्यंत शहर व तालुक्यातील शेकडों उद्योजक, व्यापारी, नोकरदार, फेरीविक्रेते, भाजी विक्रेते व मजुरी करणार्यांनीही आपापल्या परीने सहभाग नोंदविला आहे. यासर्वात लक्ष्यवेधी ठरावी अशी एक गोष्ट शहरातील चंद्रशेखर चौकातून समोर आली आहे.
श्रीराम व हनुमानाचे प्राचिन मंदिर असलेल्या चंद्रशेखर चौकात निमेश व माधुरी कोटकर हे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्या मुलांच्या मनामध्येही आपल्या या दोन्ही दैवतांबाबत विलक्षण आस्था आहे. निधी संकलन कार्यातील काही व्यक्तींनी जेव्हा त्यांच्या घरी जावून कोटकरांचे आर्थिक योगदान स्विकारले, तेव्हा तो प्रसंग पाहून त्यांच्या दहा वर्षीय श्रावणी या कन्येच्या मनातील रामही जागा झाला आणि तिने मलाही पैसे द्यायचेत म्हणून आपल्या वडिलांना सांगितले. तिच्या इच्छेनुसार वडिलांनी शंभर रुपयांची नोट तिच्या हाती देवून ‘तु दे हे पैसे’ असं तिला सांगितलं. मात्र हे नको, मी स्वतः कमाई करुन देईल असं सांगत तिने आपल्या माता-पित्यांसह कार्यकर्त्यांनाही अचंबित केले. यानंतर तिने निधीसाठी घरी आलेल्या सर्व काकांना दोन दिवसांनी माझ्यासाठी परत या असे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देत कार्यकर्ते आपल्या मोहीमेवर निघूनही गेले.
त्यानंतर त्या चिमुरडीने आपल्या वडिलांकडून काही रक्कम घेवून किराणा दुकानातून सामान आणले. दुसर्या दिवशी अभ्यास व आपली दिनचर्या सांभाळून तिने घराच्या ओट्यावरच स्वनिर्मित ‘सँडविच’ विक्रीचा स्टॉल लावला. परिसरातील नागरिकांनी व पथिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद देत काही वेळातच तिने बनविलेले सँडविच विकत घेवून फस्त केले. त्यातून जमा झालेल्या रकमेतील वडिलांचे भागभांडवल त्यांना परत दिले व शिल्लक राहिलेली शंभर रुपयांची रक्कम श्रीराम मंदिर निर्माणासाठी कार्यकर्त्यांच्या हाती सोपविली. इतक्याशा कोवळ्या मनाच्या बालिकेची ही कृती निधी संकलन करणार्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर चंद्रशेखर चौकातील प्रत्येकाच्या मनातील ऊर्जा अधिक प्रज्ज्वलित करणारीच होती. तिच्या योगदाना प्रित्यर्थ कार्यकर्त्यांनी तर तिचे कौतुक केलेच, शिवाय परिसरातील अनेकांनी तिच्या घरी जावून तिला आशीर्वाद दिले. हा सगळा प्रकार पाहून श्रावणीच्या माता-पित्यांनाही धन्यता अनुभवायला मिळाली.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी देशभरातून निधी संकलनाचे कार्य सुरु करण्यात आले आहे. या अभियानात आत्तापर्यंत कोटी रुपये देणार्या उद्योजकांसह दहा-वीस रुपयांच्या माध्यमातून हातभार लावणार्या कष्टकर्यांचाही समावेश आहे. आता त्यात श्रावणी कोटकरसारख्या दहा वर्षांच्या चिमुरडीचीही भर पडल्याने अयोध्येतील मंदिराला खर्याअर्थी राष्ट्रमंदिराचा आकार यायला सुरुवात झाली आहे. श्रावणीच्या या प्रेरणादायी प्रयत्नाचे संगमनेरातून कौतुक होत असून निधी संकलन कार्यकर्त्यांना नवऊर्जेचा संचार झाल्याची अनुभूती मिळत आहे.