मिर्झापूरच्या सायली वलवेची निर्घृण हत्याच झाल्याचा निष्कर्ष! दैनिक नायकचा पाठपुरावा; नवर्यासह सासूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वर्षभरापूर्वी प्रेमविवाह करुन वैवाहिक जीवनाची स्वप्नं पाहणार्या मिर्झापूरच्या सायली अविनाश वलवे या उच्चशिक्षित तरुणीची हत्या करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याबाबत प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडून शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाला असून मृत्यूपूर्वी सायलीला बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर तिचा गळा आवळून खून झाल्याचे आता समोर आले असून तिच्या सासरच्या मंडळींनी मृत्यूनंतर सायलीला फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी मयत सायलीच्या वडिलांनी दिलेल्या पुरवणी जवाबावरुन मयतेचा नवरा अविनाश व सासू सुभद्रा निवृत्ती वलवे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी दोन्ही आरोपींना यापूर्वीच अटक केली असून वाढीव कलमान्वये त्यांना आज पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच सायलीचा घातपात झाल्याचा दाट संशय होता. मारेकरी कुटुंबाकडून प्रकरण दाबण्याचाही आटोकाट प्रयत्न झाला, मात्र अखेर शवविच्छेदन अहवालातून वलवे कुटुंबाच्या सैतानी कृत्याला वाचा फूटली. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.

गेल्या शुक्रवारी (ता.26) सदरची धक्कादायक घटना तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली होती. मूळच्या मंगळापूर येथील रहिवाशी असलेल्या सायली विजय पवार या तरुणीने वर्षभरापूर्वी मिर्झापूर येथील निवृत्ती वलवे याचा मुलगा अविनाश याच्याशी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीचे नऊ दिवस आनंदात गेल्यानंतर वलवे कुटुंबाने आपले खरे रुप दाखवण्यास सुरुवात केली. त्यातून तिचा शारीरिक व मानसिक छळही सुरु करण्यात आला. घटनेच्या दिवशीही किरकोळ कारणावरुन सुरुवातीला नवरा अविनाश व सासू सुभद्रा सोबत तिचा वाद झाला होता, त्यावेळी ती माहेरी जाण्यासाठी घरातूनही निघाली होती. मात्र वलवे यांच्या दोघा नातेवाईकांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा मिर्झापूरला आणले आणि त्यानंतर काही वेळातच हा धक्कादायक प्रकार घडला.

याबाबत सुरुवातीला मयत सायलीची सासू सुभद्रा वलवे हिने आपल्या सुनेने तिच्या शयनकक्षातील खिडकीच्या चौकटीला ओढणीने फास बांधून आत्महत्या केल्याची खबर दिली होती. याबाबत रात्री उशिराने मयत सायलीच्या वडिलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पालिकेच्या शवविच्छेदनगृहात धाव घेतली. मयत सायलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाण झाल्याच्या जखमा होत्या. त्यामुळे तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना सुरुवातीपासूनच यामागे घातपात असल्याचा संशय होता. दरम्यानच्या काळात वलवे कुटुंबाने दबाव निर्माण करुन सदरील प्रकरण ‘आकस्मात’ ठरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र मयतेच्या कुटुंबाने ठाम भूमिका घेत छत्रपती संभाजीनगर येथील घाटी अथवा लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाची मागणी केली होती.

त्यानुसार पोलिसांनी प्रवरा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून तेथील वैद्यकिय पथकाला शवविच्छेदनासाठी पाचारण केले होते. शवविच्छेदनानंतर पथकातील सदस्यांनी कोणतेही मत प्रदर्शित केले नव्हते, त्यामुळे सायलीच्या मृत्यूमागील सस्पेन्स कायम होता. मात्र या दरम्यान दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून सुरुवातीपासूनच सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन करणार्या टीमशीही आम्ही संपर्क साधला, त्यावेळीच त्यांनी ‘आत्महत्येचा बनाव’ असल्याची व मृत्यूनंतर मयतेला फासावर लटकवल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी दैनिक नायकने सुरुवातीपासून पाठपुरावा केला.

या घटनेच्या दुसर्या दिवशी सायलीच्या वडिलांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत जावई अविनाश निवृत्ती वलवे व त्याची आई सुभद्रा निवृत्ती वलवे हे दोघेही ट्रॅक्टरची अवजारे घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेवून यावेत यासाठी सायलीचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. सुभद्रा वलवे आपल्या मुलीला ‘तु माझ्या मुलाच्या गळ्यात पडली आहेस’ असे म्हणतं नेहमी तिचा पानउतारा करीत तर नवरा हाताने मारहाण करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरुन सुरुवातीला दोघांवरही मारहाण, शिवीगाळ, धमकी देण्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता व अविनाश व सुभद्रा वलवे या दोघांनाही गजाआडही करण्यात आले होते.

आता बुधवारी (ता.1) सायंकाळी उशिराने लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयाकडून सायलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार मृत्यूपूर्वी सायलीला बेदम मारहाण झाल्याचे समोर आले आहे. मयतेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असून पाठीवर मारहाण केल्याचे वळ व जखमाही आढळून आल्या आहेत. या मारहाणीत तिच्या डोक्यालाही अंतर्गत जखमा झाल्या आणि त्यामुळे मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आढळून आले. सायलीने स्वतः गळफास घेतलेला नसून तिचा गळा आवळून खून झाल्याचे व त्यानंतर तिचा मृतदेह खिडकीच्या चौकटीला फास बांधून लटकवण्यात आल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्षही शवविच्छेदनातून उघड झाला आहे.

अहवाल प्राप्त होताच तालुका पोलिसांनी मयत सायलीचे वडिल विजय महिपतराव पवार यांचा पुरवणी जवाब नोंदवला आहे. त्यानुसार 26 एप्रिल रोजी दुपारी आपली मुलगी सायलीचे सासु-सासर्याचे कपडे धुण्यावरुन नवरा अविनाश व सासू सुभद्रा वलवेशी भांडणं झाले व त्याचे पर्यवसान या दोघांकडून तिला मारहाण करण्यात झाल्याने रागाच्या भरात सायली दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास मिर्झापूरहून मंगळापूरला येण्यासाठी पायी निघाली होती. त्यावेळी अविनाश वलवे याने आपल्या दोघा नातेवाईकांना पाठीमागून पाठवित तिची समजूत काढून तिला पुन्हा माघारी आणले.

‘त्या‘ दोघांसह ती पुन्हा घरी परतली तेव्हा नवरा अविनाश याने ‘तु कोठे गेली होतीस?, माझी इज्जत घालवतेस का?’ असे म्हणतं तिला मारहाण केली, त्यात तिला मार लागलेला होता. आजरोजी (ता.1) सायलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात गळा आवळल्याने व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून जावई अविनाश व त्याची आई सुभद्रा वलवे यांनी कपडे धुण्याच्या कारणावरुन तिला मारहाण करीत गळा आवळून तिचा खून केल्याचे त्यांनी आपल्या जवाबात सांगितले आहे. त्यावरुन पोलिसांनी मयतेचा नवरा अविनाश निवृत्ती वलवे व सासू सुभद्रा निवृत्ती वलवे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही यापूर्वीच गजाआड करण्यात आले आहे.

या धक्कादायक प्रकरणातील मयत सायलीचे वडिल अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. आई, पत्नी, दोन मुले व दोन मुली असा परिवार असलेल्या विजय पवार यांच्या धाकट्या सायलीने वर्षभरापूर्वी मिर्झापूरमधील निवृत्ती वलवे याच्या अविनाश या मुलाशी प्रेमविवाह केला होता. मात्र वर्षभरातच तिला आपल्या जीवनाला मुकावे लागले. या प्रकरणात वलवे कुटुंबाने मोठा दबाव निर्माण केल्याची माहिती मिळाल्यानंतर दैनिक नायकने आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या दबावाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही आणि अखेर वलवे कुटुंबाचे दूष्कृत्य त्यांना गजाआड घेवूनच गेले.

धक्कादायक म्हणजे घटनेच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास मयतेचा सासरा निवृत्ती वलवे हा मंगळापूरला सायलीच्या माहेरी आला होता, तेथे चहापान घेतल्यानंतर तो मिर्झापूरला रवाना झाला. मयतेच्या सासुने तालुका पोलिसांना दिलेल्या खबरीनुसार सदरची घटना सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी घडल्याचे सांगण्यात आले. त्यावरुन सासूकडून नवर्याला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचेही आता लपून राहिलेले नाही. कारण वलवेच्या ज्या दोघा नातेवाईकांनी रागाच्या भरात घरातून निघालेल्या सायलीला माघारी मिर्झापूरला नेले होते, त्यांनी तालुका पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सायलीला घेवून ते घरी परतले तेव्हा तेथे तिच्या नवर्यासह सासु आणि सासरा दोघेही हजर असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नवरा अविनाश घराबाहेर असताना सासु-सासरा आणि सायली तिघेच घरात गेले व त्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला. त्यामुळे या प्रकरणात सासरा निवृत्ती वलवेही दोषी असल्याचे दिसून येत असून लवकरच त्याच्याही मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.

पोटच्या मुलीसोबतही असाच प्रकार..
निवृत्ती व सुभद्रा वलवे यांच्या मुलीनेही अशाचप्रकारे वडगावपानमध्ये आत्महत्या केली होती. निवृत्ती वलवे याने तिच्या सासर्याकडून काही रक्कम हात उसनी घेतली होती, मात्र मुदत संपल्यानंतरही ती रक्कम परत देण्यास त्याच्याकडून टाळाटाळ होवू लागल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी बापाकडून पैसे घेवून येण्याचा तगादा लावला. तर दुसरीकडे जन्मदात्या बापाने ‘तुझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, तु बोलू नकोस, मी माझे पाहून घेईल’ असे सांगत एकप्रकारे तिची कुचंबणाच करुन टाकल्याने आत्महत्येशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. आठ वर्षांपूर्वी आपल्या पोटच्या मुलीला आत्महत्येस भाग पाडल्यानंतर आता निवृत्ती व सुभद्रा या जोडीने सुनेचाही निर्घृण खून केल्याने त्या तिघांसाठी कारागृहाची कवाडं उघडण्यात आली असून त्यातील दोघांची रवानगीही झाली आहे.

