संगमनेर तालुक्याची वाटचाल कुपोषणमुक्त बालकांच्या दिशेने! एकात्मिक बालविकास सेवायोजनेंतर्गत पंयाचत समितीचे उल्लेखनीय काम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवायोजनेंतर्गत संगमनेर तालुक्यातील 142 गावांमध्ये धडक कुपोषीत बालक शोध मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेत तालुक्यात मध्यम व कमी वजनाची 3 हजार 830 बालके आढळली होती. या बालकांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवून संगमनेरच्या पंचायत समितीने गावपातळीपर्यंत जनजागृती करतांना नेत्रदीपक काम केले. त्याचा परिणाम अवघ्या पाच महिन्यात तालुक्यातील कुपोषीत मुलांची संख्या तिपटीने कमी होवून ती आता अवघ्या 931 वर आली असून येणार्‍या कालावधीत ती शून्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली.

एकात्मिक बालविकास सेवायोजनेंतर्गत 15 ते 30 ऑगस्ट, 2021 या कालावधीत संगमनेर तालुक्यातील 142 गावांमधून ही शोध मोहीम राबविण्यात आली होती. त्यातून मध्यम कमी वजनाची 2 हजार 898, तीव्र कमी वजनाची 307, मॅम श्रेणीतील 525 व सॅम श्रेणीतील शंभर बालके आढळली. या बालकांचे श्रेणीवर्धन करुन त्यांचे सुपोषण करण्यासाठी पंचायत समितीने निश्चित कालमर्यादा ठरविताना 26 जानेवारी, 2022 पर्यंतचे लक्ष्य ठेवले होते. यासाठी पंचायत समितीच्या स्तरावर पदाधिकारी व ग्रामपंचायतीच्या स्तरावर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना बालके दत्तक देण्यात आली. या कामात तालुक्यातील सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला.

या उपक्रमाला ‘मिशन’ समजून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी मनापासून नियोजन केले. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत पातळीवर वारंवार बैठकांचे आयोजन केले. आपल्या गावात एकही मुल कुपोषीत राहणार नाही अशी शपथही या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाला दिली. त्यामुळे कुपोषीत बालके आढळलेल्या गावातील ग्रामपंचायतीही या उपक्रमात हिरिरीने सहभागी झाल्या. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मॅम व सॅम श्रेणीतील बालकांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण निधीतून 10 टक्के पोषक आहार, पावडर व औषधे उपलब्ध करुन देण्यात आली.

या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणजे तालुक्यातील कुपोषीत बालकांच्या संख्येत मोठी घट होण्यात झाला. त्यातून तालुक्यात आढळलेल्या सुमारे चार हजार कमी वजनाच्या बालकांमध्ये श्रेणीवर्धन होवून त्यांची संख्या आजच्या स्थितीत अवघी 931 वर आली आहे. त्यामुळे संगमनेर तालुका आता कुपोषण मुक्तीच्या उंबरठ्यावर असून लवकर कुपोषण मुक्त होईल असा विश्वास गटविकास अधिकारी नागणे यांनी व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय कार्यात शासकीय विभाग व पदाधिकार्‍यांसह चंदुकाका सराफ, राजहंस दूध संघ, आधार सेवाभावी संस्था (तळेगाव), बाळेश्वर सेवाभावी संस्था (जवळे बाळेश्वर) व जय केमिकल्स या खासगी संस्थांसह तालुक्यातील महिला बचत गटांनीही मोठे योगदान दिले. या मोहीमेदरम्यान हृदयरोग व मतीमंद आढळलेल्या तालुक्यातील एकूण तेरा बालकांवर नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रीयाही करण्यात येवून त्यांना जीवनदान देण्यात आले.

राष्ट्रीय बालस्वास्थ अभियानांतर्गत काम करणारे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनिस, आरोग्य विभाग या सर्वांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील कुपोषणाची संख्या कमालीची खाली आहे. आजच्या स्थितीत ही संख्या मध्यम वजनाची 931, तीव्र कमी वजनाची 110, मॅम 52 आणि सॅम पाच मुले इथवर घसरली आहे. सर्वसाधारणपणे सॅम श्रेणीतील मुलांमध्ये 95 टक्के व मॅम श्रेणीतील मुलांमध्ये 90 टक्के सुधारण दिसून येत आहे. सामूहिक प्रयत्नातून सुरु असलेल्या प्रयत्नांना लवकरच पूर्ण यश मिळेल व तालुक्यातील सर्व बालके सुपोषीत असतील असा विश्वास गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Visits: 106 Today: 4 Total: 1111095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *