स्व.यशवंतराव भांगरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण
नायक वृत्तसेवा, अकोले
माजी आमदार स्व.यशवंतराव भांगरे याच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (ता.24) सकाळी 10 वाजता होणार आहे. यावेळी होणार्या शेतकरी मेळाव्यालाही ते संबोधित करणार आहेत. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भूषविणार आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार हेमंत गोडसे, राजेंद्र गावित व सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी दिली आहे.
अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भांगरे पुढे म्हणाले, तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी ज्येष्ठ नेते पवारांकडे आग्रह धरण्यात येणार आहे. सह्याद्री पर्वतरांगांतून पश्चिमेकडे कोकणात वाहून जाणारे पाणी भंडारदरा धरण व राहुरीतील ज्ञानेश्वर सागरच्या पाणलोट क्षेत्र परिसरात वळविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प, पर्यटन विकास, पाणी प्रश्न, वळण बंधारे, अपूर्णावस्थेतील बिताका प्रकल्प, तालुक्यातील रस्ते व ग्रामविकास याबाबत चर्चा करून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, अरूण जगताप, डॉ.किरण लहामटे, लहु कानडे, दौलत दरोडा, संग्राम जगताप, आशुतोष काळे, रोहित पवार, नीलेश लंके, माणिक कोकाटे, हिरामण खोसकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडेे, सरचिटणीस विकास बंगाळ व युवक शहराध्यक्ष अमित नाईकवाडी उपस्थित होते.